March 7, 2026

पिण्याच्या पाण्यात नारू; उस्सेगावात आरोग्य धोक्यात

देसाईगंज, १७ ऑगस्ट : तालुक्यातील शिवराजपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उस्सेगाव येथे जल जीवन मिशन आणि इतर योजनांद्वारे कोट्यवधी रुपये खर्चून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, शनिवारी (16 ऑगस्ट 2025) सायंकाळी अजय नेवारे यांच्या घरातील नळाच्या पाण्यात नारू (कृमी) आढळल्याने गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता धोक्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्या जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातले असून, काही मृत्यूही नोंदवले गेले आहेत. यापार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सहाय्यकांना निलंबित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पाण्यात नारू आढळणे गावकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.

गावकऱ्यांचा आरोप आहे की, पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाल्यापासून ती कधीच साफ करण्यात आली नाही. याबाबत शिवराजपूर ग्रामपंचायतच्या सरपंच सुषमा सयाम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, पावसाळ्यामुळे जंतूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो, परंतु आमचे कर्मचारी नियमितपणे ब्लिचिंग पावडर टाकून टाकीची स्वच्छता करतात.

मात्र, गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीची तातडीने साफसफाई आणि पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी केली आहे. याबाबत प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!