April 23, 2026

दोन जणांचा नाल्याच्या पाण्यात मृत्यू, भामरागड जलमय

गडचिरोली, २० ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, तुडुंब भरलेल्या नाल्यांमुळे दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भामरागड आणि अहेरी तालुक्यातील या घटनांनी परिसरात शोककळा पसरली आहे. पर्लकोटा नदीचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने गाव बेटासारखे झाले असून, ३० ते ४० घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात १७२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दोन दुर्दैवी मृत्यू
पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असताना दोन जणांचा पुरात वाहून जाऊन मृत्यू झाला. भामरागड तालुक्यातील कोडपे गावात १८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास १९ वर्षीय लालचंद कपिलसाय लकडा हा तरुण खंडी नाल्याच्या पुरात वाहून गेला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह नाल्याजवळ आढळला. दुसरी घटना अहेरी तालुक्यातील पल्ले गावात घडली, जिथे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक असंतू सोमा तलांडी (वय ४०) हे सिपनपल्ली नाल्याच्या पुरात वाहून गेले. त्यांचा मृतदेहही हाती लागला आहे. या घटनांमुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

पूरस्थिती आणि वाहतूक ठप्प
पर्लकोटा, वटरा, पोहार, गोमणी आणि सिपनपल्ली नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने १२ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. भामरागड, अहेरी, चामोर्शी, मुलचेरा, कुरखेडा आणि देसाईगंज तालुक्यांतील रस्ते आणि ठेंगण्या पूल पाण्याखाली गेल्याने शेकडो गावांचा तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. बंद झालेल्या मार्गांमध्ये हेमलकसा-भामरागड राष्ट्रीय महामार्ग-१३० डी, सिरोंचा-असरअली-जगदलपूर रस्ता आणि अहेरी-वटरा रस्त्यांचा समावेश आहे.

प्रशासनाचे प्रयत्न
जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. भामरागडमधील पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक, महसूल आणि पोलीस प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नद्या आणि नाल्यांच्या काठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

प्रशासनाचे आवाहन
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!