September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

भामरागडात पुन्हा पुराचे संकट: 100 गावांचा संपर्क तुटला, 30-35 दुकानांत पाणी, गर्भवती महिलेचा थरारक रेस्क्यू

आनंद दहागावकर/ अहेरी/ गडचिरोली, 27 ऑगस्ट: गणेश चतुर्थीच्या दिवशी भामरागड तालुक्यावर पुन्हा एकदा पुराचे संकट कोसळले आहे. छत्तीसगडमधील मुसळधार पावसामुळे इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुलगौतम नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. यामुळे तालुक्यातील 100 हून अधिक गावांचा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. अहेरी ते भामरागड रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

26 ऑगस्टच्या रात्री पर्लकोटा नदीच्या पाण्याने भामरागड तालुका मुख्यालयात प्रवेश केला, ज्यामुळे 30 ते 35 दुकानांत पाणी शिरले. मध्यरात्री अचानक पाण्याची पातळी वाढल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. प्रशासनाने तातडीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. हवामान खात्याने 26 आणि 27 ऑगस्टसाठी छत्तीसगडमध्ये रेड अलर्ट जारी केला असून, सर्व नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

गर्भवती महिलेचा थरारक रेस्क्यू
पामुलगौतम नदीपलीकडील हिंदेवाडा येथील गर्भवती महिला सौ. अर्चना विकास तिम्मा यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, नद्या तुडुंब भरलेल्या असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. 27 ऑगस्टच्या पहाटे 4 वाजता एसडीआरएफच्या पथकाने बोटीद्वारे थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवत अर्चनाला पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले. सध्या तिला भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रशासन अलर्ट मोडवर असून, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वीही तीनदा भामरागडचा संपर्क तुटला होता, आणि आता पुन्हा निर्माण झालेल्या या संकटामुळे तालुक्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!