March 7, 2026

कोपर्शी जंगलात ८ तासांच्या चकमकीत ४ नक्षलवादी ठार; भूपती, कोसा यांच्या उपस्थितीची शक्यता, नक्षल चळवळीला मोठा धक्का

गडचिरोली, २८ ऑगस्ट : गडचिरोली-नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात आज सकाळी पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले. त्यापैकी एक पुरुष व तीन महिला नक्षलवादी आहेत. घटनास्थळावरून ‘एसएलआर’ रायफल, दोन इन्सास रायफल व एक ३०३ रायफलसह शस्त्रसाठा व नक्षल साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या परिसरात दोन दिवसांपासून केंद्रीय समिती सदस्य सोनू उर्फ भूपती व कोसा हे सदस्यांसह ठाण मांडून बसले होते. चकमकीनंतरही घनदाट जंगलात काही नक्षलवादी लपले असण्याची शक्यता सांगितली जात असून, नक्षलविरोधी मोहीम सुरूच आहे.

२५ ऑगस्ट रोजी छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी घनदाट जंगलात गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० व इतर नक्षलवादी नेत्यांसह बैठक झाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी अपर अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० च्या १९ जणांच्या तुकडीसह सीआरपीएफच्या तुकड्या नक्षलविरोधी अभियानासाठी रवाना केल्या. मागील दोन दिवस मुसळधार पावसामुळे जंगलात पोहोचण्यासाठी पोलिसांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला.

दरम्यान, आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी जंगलात दबा धरून पोलिसांवर जोरदार गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर देत आठ तास चाललेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. चकमकीनंतर परिसराची शोध मोहीम चालू असून, अजूनही काही नक्षलवादी जंगलात लपले असण्याची शक्यता आहे.

केंद्रीय समिती सदस्यांची उपस्थिती?
गेल्या चार वर्षांत गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हालचाली मर्यादित झाल्या आहेत. अनेक नेते व सदस्य चकमकीत मारले गेले असून, नवीन भरती बंद झाल्याने चळवळ कमकुवत झाली आहे. शेजारच्या छत्तीसगडमध्येही नक्षलविरोधी मोहिमा तीव्र झाल्याने नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे. यावर चर्चा करण्यासाठी कोपर्शी जंगलात नक्षल चळवळीचा प्रभारी नेता व केंद्रीय समिती सदस्य भूपती (सोनू) व केदारी रेड्डी उर्फ कोसा हे सदस्यांसह आले असल्याची शक्यता सूत्रांनी सांगितली आहे. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला असून, जिल्ह्यातील नक्षल चळवळ आणखी कमकुवत होण्याची अपेक्षा आहे. पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!