माणुसकीचा दिपस्तंभ: नक्षलग्रस्त भागातील वृद्ध महिलेची सुखद घरवापसी
“माणुसकीचा विजय! नक्षलग्रस्त भागातील 80 वर्षीय वृद्ध महिलेची सुखरूप घरी परत”
एटापल्ली, २८ ऑगस्ट : तालुक्यातील नक्षलग्रस्त सुरजागड नेंडेर येथील 80 वर्षीय चिन्नी बैरा जोई या वृद्ध महिलेची माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीमुळे सुखरूप घरी परतण्याची हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे. नातेवाईकांच्या घरी निघालेल्या चिन्नी बाई यांना रस्ता चुकल्याने गेल्या चार दिवसांपासून त्या आलापल्ली येथील मन्नेवार कॉलनीत भटकत होत्या. माडिया भाषेशिवाय अन्य भाषा न येणाऱ्या या वृद्ध महिलेची ओळख आणि गाव शोधणे स्थानिकांना कठीण जात होते. तरीही परिसरातील नागरिकांनी माणुसकी दाखवत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.
या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत यांनी तत्परतेने पुढाकार घेतला. त्यांनी व्हाट्सअॅप ग्रुपद्वारे माहिती प्रसारित करून चिन्नी बाईंच्या गावाचा शोध घेतला. त्यांना नेंडेर गावातील असल्याचे समजले. यानंतर कैलाश यांनी सामाजिक कार्यकर्ते रोमीत तोम्बर्लावार यांच्याशी संपर्क साधून वाहनाची व्यवस्था करण्याची विनंती केली. रोमीत यांनी तातडीने वाहन पाठवून या कार्यात मोलाची साथ दिली. अखेरीस, चिन्नी बाईंना सुखरूप त्यांच्या गावी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
या प्रसंगी कैलाश कोरेत, हितेश कुळसंगे, आशु चापले, भगवान गावडे, पाटाडी हिचामी, अर्जुन आलाम, मंगेश पुंगाटी, रैजू हिचामी, संतोष उसेंडी आणि इतरांनी महत्त्वाची भूमिका निभावली. कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. नक्षलग्रस्त भागातील या संवेदनशील परिस्थितीत दाखवलेली माणुसकी आणि एकजुटीची ही घटना खरोखरच कौतुकास्पद आहे.
