महामार्गाच्या दुरवस्थेपासून दारू विक्रीपर्यंत: कुरखेडा जनता दरबारात प्रशासनावर टीकास्त्र
“कुरखेडा जनता दरबारात महामार्ग दुरुस्ती व अवैध दारू विक्रीवर नागरिकांचा रोष; आमदार मसराम यांचा समन्वयासाठी निर्देश”
कुरखेडा, २८ ऑगस्ट : तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांसाठी आयोजित जनता दरबारात महामार्गाच्या दुरवस्थेवर आणि जिल्ह्यात दारूबंदी असतानाही शहरात उघडपणे होणाऱ्या दारू विक्रीवर जोरदार चर्चा झाली. नागरिकांनी महामार्ग विभाग आणि पोलिस विभागावर कडक प्रश्न उपस्थित करत प्रशासकीय उदासीनतेचा आरोप केला. यावेळी आमदार रामदास मसराम यांनी संबंधित विभागांना समन्वयाने काम करण्याचे आणि तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याचे निर्देश दिले.
मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या सती नदीवरील पुलाच्या बांधकामाबाबत आणि गोठणगाव टी-पॉइंट ते जांभुरखेडा मार्गाच्या खराब स्थितीबाबत नागरिकांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना घेरले. “नागरिकांना किती दिवस त्रास देणार? कामाची गुणवत्ता आणि उपाययोजना काय?” असे प्रश्न विचारत त्यांनी प्रशासकीय दुर्लक्षितेवर बोट ठेवले. कुरखेडा मुख्य बाजारपेठेतील महामार्ग अतिक्रमणधारकांना वाचवत अरुंद करण्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. तसेच, शहरातील निकृष्ट नाल्यांच्या बांधकामाबाबत आणि त्यांच्या अपूर्णतेबाबतही विभागावर टीका झाली. यावर कंत्राटदाराने नगरपंचायत प्रशासनाचे सहकार्य नसल्याचे सांगितले, तर नगरपंचायतीने पत्रव्यवहार नसल्याचा आणि पाणीपुरवठा वाहिनीला नुकसान होत असल्याचा आरोप केला. दोन्ही बाजूंचे आरोप-प्रत्यारोप ऐकून आमदार मसराम यांनी कामाची गुणवत्ता सुधारण्याच्या सूचना देत, “कोणतेही काम समन्वयाशिवाय शक्य नाही. नगरपंचायत आणि कंत्राटदारांनी एकत्र येऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी,” असे सांगितले.
दरम्यान, कुरखेडा शहरातील अवैध दारू विक्रीवर पोलिस विभागाने वर्षभरात ११० कार्यवाह्या केल्याचे आकडे मांडले. मात्र, नागरिकांनी यावर आक्षेप घेत मुख्यालयातील देशी-विदेशी दारू विक्रेत्यांना सोडून जंगलातील हातभट्टीवरच कारवाई होत असल्याचा आरोप केला. आंबेडकर चौक, गांधी वार्ड, आझाद वार्ड येथील उघडपणे चालू असलेल्या विक्रीवर पोलिस मेहरबान असल्याचे सांगितले. एका बड्या सप्लायरला अभय मिळाल्याने विक्री जोमात सुरू असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला. पोलिस विभागाने सप्लायरवरही कारवाई केल्याचे सांगितले, तरी नागरिकांनी आमदार मसराम यांना गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीची समीक्षा विधानसभेत करून बंदी हटविण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. “कारवाईनंतरही विक्री सुरू असेल तर बंदी हटविणे हा एकमेव पर्याय,” असे मत जनता दरबारात व्याप्त झाले. अवैध दारूवर कठोर कारवाई आणि बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या.
या जनता दरबारात तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विविध विभागांकडून जवळपास ९० लेखी तक्रारी नोंदवून त्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. आमदार मसराम यांनी पुढील जनता दरबार बोलावून या सूचनांवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्याची आणि संबंधित विभागांना इशारा देण्याची सूचना केली.
या वेळी आमदार रामदास मसराम यांच्या सह नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, नायब तहसीलदार आमदवार राहुल आंबिलकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष जीवन नट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, विधानसभा प्रमुख परसराम टिकले, माजी सभापती गिरीधर तितराम आदी मान्यवर उपस्थित होते.
