“हत्तींची दहशत, वन विभागाची निष्क्रियता: वामन गेडाम यांच्या मृत्यूवर आपची संतप्त प्रतिक्रिया”
गडचिरोली, ११ सप्टेंबर :आम आदमी पक्षाचे (आप) गडचिरोली जिल्हा सचिव अमृत मेहेर यांनी चुरचुरा जंगलातील हृदयद्रावक हत्ती हल्ल्यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली आहे. वामन मारोती गेडाम (६२) यांचा मृत्यू ही केवळ एक व्यक्तिगत घटना नसून, वन विभागाच्या पूर्ण निष्क्रियतेमुळे घडलेली मोठी दुर्घटना असल्याचे ते म्हणाले. “हे हत्तींचे कळप जंगलात फिरत असल्याचे स्थानिकांना माहीत होते, तरीही वन विभागाने कोणतीही पूर्वसूचना, पेट्रोलिंग किंवा हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. हा मृत्यू हा वन विभागाच्या लापरवाहीचा थेट परिणाम आहे! आम आदमी पक्ष आम्हाला असा प्रशासन हवा नाही जे गरीब शेतकरी आणि आदिवासींच्या जीवाची किंमत शून्य समजते,” असे मेहेर म्हणाले.
मेहेर यांनी पुढे सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत हत्तींमुळे ११ लोकांचा बळी गेला आहे. “शासन आणि वन विभाग फक्त आकडेवारी सांगतात, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांची शेती उध्वस्त होत आहे, गुरे चारण्यासाठी जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे. हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतेही ठोस पावले उचलली जात नाहीत. हे हत्ती छत्तीसगढमधून आलेले आहेत, तरीही महाराष्ट्र शासनाने सीमेवर हत्ती रोखण्यासाठी किंवा त्यांना परत पाठवण्यासाठी काहीच केले नाही. वन विभागाचे अधिकारी बसले आहेत, पण प्रत्यक्ष कारवाई शून्य! ही निष्क्रियता म्हणजे आम आदमीच्या जीवावर बेतलेली आहे,” असे त्यांनी फटकेबाजी केली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचारी नसल्यामुळे कुटुंबीयांना संपूर्ण रात्र हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, यावरही मेहेर यांनी रोष व्यक्त केला. “मृत्यूनंतरही प्रशासनाची असंवेदनशीलता! जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन सुविधा उपलब्ध नाहीत का? हे सर्व काही दाखवते की, या जिल्ह्यातील आदिवासी आणि गरीबांसाठी प्रशासन किती उदासीन आहे. आम आदमी पक्ष हे सहन करणार नाही. आम्ही तात्काळ जिल्हाधिकारी आणि वन संरक्षकांना भेटणार आहोत आणि हत्तींच्या बंदोबस्तासाठी, पीडित कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करणार आहोत,” असे मेहेर यांनी घोषित केले.
मेहेर यांनी शासनावर हल्लाबोल करताना म्हटले की, “भाजप शासनाच्या काळात हत्तींची दहशत वाढतच आहे. वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांना शेती कशी करावी, असा प्रश्न पडला आहे. आम आदमी पक्ष आमच्या ‘आम आदमी’साठी लढतो, आणि हा लढा आम्ही सोडणार नाही. वामन गेडाम यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत, हत्तींच्या बंदोबस्तासाठी तात्काळ कारवाई आणि वन विभागाच्या जबाबदाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. अन्यथा, आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत!”
आम आदमी पक्षाने सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र येऊन हत्ती समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
