March 7, 2026

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले: आम आदमी पार्टीची हेक्टरी ५०,००० रुपये नुकसान भरपाईची मागणी

गडचिरोली, १७ सप्टेंबर : महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटात सापडले आहेत. विदर्भातील धान, सोयाबीन, कापूस, संत्रा, मोसंबी आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गडचिरोली,  पुणे, सोलापूर, बीड, भंडारा आणि अहमदनगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले असून, त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, आम आदमी पार्टी (आप) महाराष्ट्राने शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली आहे.

सदर मागणीसाठी आपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. या निवेदन सादर करताना जिल्हा अध्यक्ष नसिर हाशमी, जिल्हा सचिव अमृत मेहेर, जिल्हा सहसचिव संतोष कोडापे, जिल्हा संघटन मंत्री ताहीर शेख, जिल्हा सह संघटन मंत्री शत्रुघ्न नन्नावरे, जिल्हा युवा अध्यक्ष साहिल बोदेले, जिल्हा युवा उपाध्यक्ष राहुल मेश्राम आणि सह मीडिया प्रमुख फैयाज शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सध्याच्या शासन आदेशानुसार (३० मे २०२५), कोरडवाहू शेतीसाठी केवळ ८,५०० रुपये आणि बागायती शेतीसाठी १७,००० रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई निश्चित आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत अत्यंत अपुरी आहे. दररोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत असलेल्या महाराष्ट्रात ही परिस्थिती गंभीर आहे. आपने पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारचे उदाहरण दिले, जिथे शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी हेक्टरी ५०,००० रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. हा देशातील सर्वाधिक नुकसान भरपाईचा दाखला आहे. याच धर्तीवर, महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी आपने केली आहे.

याशिवाय, केंद्र सरकारने अमेरिकेतून आयात होणाऱ्या कापसावरील ११% आयात कर काढून टाकल्याने कापसाला हमीभावापेक्षा सुमारे १,५०० रुपये कमी दर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणखी वाढणार आहे. आपने मागणी केली आहे की, पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५०,००० रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी, दोन हेक्टर मर्यादा रद्द करावी, कर्जमाफी आणि हमीभावाची त्वरित अंमलबजावणी करावी तसेच आयात कापसावरील कर पुन्हा लागू करावा.

या मागण्या मान्य न झाल्यास, आपने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या या संकटकाळात तातडीने पंचनामे आणि आर्थिक मदत आवश्यक आहे. आपच्या या मागणीमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!