March 7, 2026

गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमीन वाद आणि अनियमिततांविरोधात आम आदमी पार्टीचा इशारा: आठवड्याभरात कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन

गडचिरोली, १७ सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमीन वाद आणि सध्याच्या तात्पुरत्या महाविद्यालयातील गंभीर अनियमिततांविरोधात आम आदमी पार्टीने पालकमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करत तीव्र पवित्रा घेतला आहे. आठवड्याभरात ठोस कारवाई न झाल्यास जिल्हाभर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नसीर हाशमी यांनी दिला. निवेदन सादर करताना जिल्हा सचिव अमृत मेहेर, जिल्हा सहसचिव संतोष कोडापे, जिल्हा संघटनमंत्री ताहीर शेख, जिल्हा सहसंघटनमंत्री शत्रुघ्न नन्नावरे, जिल्हा युवा अध्यक्ष साहिल बोदेले, जिल्हा युवा उपाध्यक्ष राहुल मेश्राम, सहमीडिया प्रमुख फैयाज शेख आदी पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

जमीन वादामुळे प्रकल्प रखडला 
गडचिरोलीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही एक महत्त्वाची उपलब्धी आहे. परंतु, जागेअभावी हा प्रकल्प रखडला आहे. सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयालगत असलेली कृषी महाविद्यालयाची १५ हेक्टर जागा अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, यामुळे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर प्राप्त झालेल्या कृषी महाविद्यालयाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. “कृषी महाविद्यालय वाचवणे आवश्यक आहे,” असे नसीर हाशमी यांनी निवेदनात नमूद केले. गडचिरोली शहरात महसूल आणि वने महसूल विभागाकडे उपलब्ध असलेल्या जागेचा शोध घेऊन तिथे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची मागणी त्यांनी केली. प्रशासन या बाबतीत गंभीर नसल्याचा आरोप करत, जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ आदेश देण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

विकासकाम आणि भरतीतील अनियमिततांचा आरोप 
सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात तात्पुरत्या स्वरूपात सुरू असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात २८ कोटींच्या विकासकामात आणि नियोजनात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप हाशमी यांनी केला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनीच चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, कंत्राटी प्राध्यापक आणि कर्मचारी भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही समोर आले आहे. निवेदनानुसार, नियुक्त प्राध्यापकांपैकी केवळ १० टक्के प्राध्यापक पूर्णवेळ कार्यरत असून, इतर केवळ वेतन घेत आहेत. “हा भोंगळ कारभार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. पालकमंत्री असूनही यावर नियंत्रण नाही,” असे हाशमी यांनी ठणकावले.

डॉ. टेकाडे यांच्यावर कारवाईची मागणी
या सर्व अनियमिततांना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. टेकाडे जबाबदार असल्याचा आरोप करत, त्यांना तात्काळ पदावरून हटवून त्यांच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. “आठवड्याभरात या मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास आम आदमी पार्टी जिल्हाभरात तीव्र जनआंदोलन उभारेल. याला पूर्णपणे जिल्हा प्रशासन जबाबदार असेल,” असा इशारा हाशमी यांनी दिला.

जिल्हावासीयांचा पाठिंबा
गडचिरोलीतील बहुसंख्य नागरिक वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र जागेच्या मागणीसह अनियमिततांविरोधात एकत्र येत आहेत. या वाद आणि अनियमिततांमुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता प्रशासन आणि सरकार यावर किती तत्परतेने कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!