September 7, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

आपचा आक्रोश: शेतकऱ्यांचे थकीत पैसे आणि वनपट्टाधारकांचा बोनस त्वरित द्या!

“शेतकऱ्यांच्या थकीत चुकाऱ्यांसाठी आम आदमी पार्टीचे आक्रमक पाऊल: आदिवासी विकास महामंडळाला निवेदन सादर”

गडचिरोली, 17 सप्टेंबर : रब्बी हंगामात शासकीय आधारभूत किंमत योजनेंतर्गत धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही थकीत चुकारे मिळाले नसल्याने आणि वनपट्टाधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहन बोनसपासून वंचित ठेवण्यात आल्याने आम आदमी पार्टीने (आप) आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात आज जिल्हा अध्यक्ष नसिर हाशमी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक व्यवस्थापक श्री. सांबरे , आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोली यांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हा सचिव अमृत मेहेर, जिल्हा सहसचिव संतोष कोडापे, जिल्हा संघटन मंत्री ताहीर शेख, जिल्हा सहसंघटन मंत्री शत्रुघ्न नन्नावरे, जिल्हा युवा अध्यक्ष साहिल बोदेले, जिल्हा युवा उपाध्यक्ष राहुल मेश्राम आणि सहमीडिया प्रमुख फैयाज शेख उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रांवर रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धान खरेदी झाली, परंतु तीन ते चार महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, खरीप हंगामासाठी कर्ज काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शेतकरी बँक आणि मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात वारंवार चौकशीसाठी खेटे घालत असूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. तसेच, वनपट्टाधारक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहन बोनसपासून वंचित ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे.

आपचे जिल्हा अध्यक्ष नसिर हाशमी म्हणाले, “शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी त्वरित चुकारे आणि बोनस देणे आवश्यक आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय आहे. आम्ही याप्रकरणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहू.”

निवेदनात त्वरित थकीत चुकाऱ्यांचा भरणा, वनपट्टाधारक शेतकऱ्यांना बोनसचा लाभ आणि भविष्यात अशा विलंब टाळण्यासाठी पारदर्शक यंत्रणा विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटली असून, प्रशासनाकडून त्वरित कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!