March 7, 2026

आत्राम यांचा ‘जनकल्याण’ तमाशा: शेतकऱ्यांचे खिसे रिकामे, मंचावर फक्त नौटंकी!

देसाईगंज, २७ ऑक्टोबर : गडचिरोलीच्या हेलीपॅड ग्राउंडवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या ‘जनकल्याण मेळाव्या’च्या नावाखाली जोरदार नौटंकी रंगली. माजी राज्यमंत्री आणि अहेरीचे आमदार डॉ. धर्मराव आत्राम यांनी ‘विकासाची गंगा’ आणि ‘एकला चलो रे’चा नारा देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्ता देण्याचा जणू फतवा काढला. पण मंचावर अभिनेत्री आणि कार्यकर्त्यांचा मेळ, आणि खाली शेतकऱ्यांच्या रिकाम्या खिशांचा कडेलोट – हा कसला ‘जनकल्याण’? की फक्त निवडणुकीच्या आखाड्यातला नवा डाव?

आत्राम यांनी गडचिरोलीच्या ‘सर्वांगीण विकासा’चा डंका वाजवला. म्हणाले, “देसाईगंज-कोरची तालुका निर्मिती, सुरजागड लोह प्रकल्प, आणि शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय जिंदल स्टील प्लांटला जमीन नाही!” पण प्रत्यक्षात काय? धनखरेदीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाहीत – मग ही ‘गंगा’ कुठे वाहतेय? वनपट्टेदार शेतकऱ्यांना बोनसची घोषणा झाली, पण ३,७८२ शेतकऱ्यांचे खाते अजूनही शून्य! अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी २६७.५४ लाखांचा निधी जाहीर झाला, पण शेतकऱ्यांना मिळाली फक्त हवेची थाप! ७/१२ कोरा’चा नारा देत मते मिळवली, पण कर्जमाफीचे धोरण अजूनही स्वप्नातच!

अहेरी मतदारसंघात रस्ते नाहीत, फक्त खड्ड्यांचा जंगलराज! लोहखनिज कंपन्या स्थानिक आदिवासींना रोजगार देण्याऐवजी फक्त प्रदूषण आणि विस्थापनाची भेट देताहेत. ऑक्टोबर संपला, पण धनखरेदीची हालचाल शून्य! उन्हाळी धान खरेदी केंद्रांवर सडतंय, आणि खरेदी संस्थांना मागील पावसाळी व उन्हाळी धनाचे कमिशनही मिळाले नाही. मग हा ‘जनकल्याण’ मेळावा म्हणजे काय? मंचावर नट्या बसवून, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशाचा जल्लोष करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार?

मित्रपक्षांना ‘युतीधर्म’चा टोमणा, पण स्वतःचं धोरण काय?आत्राम यांनी मित्रपक्षांवर युतीधर्म न पाळल्याचा ठपका ठेवला, पण स्वतःच्या पक्षाने शेतकऱ्यांचा विश्वास का गमावला, याचं उत्तर नाही! देसाईगंज नगर परिषदेत कर्मचारी-अधिकाऱ्यांची हुकूमशाही चालते, पण स्थानिक आमदार डोळ्यावर पट्टी बांधून का बसलेत? माजी जि.प. सदस्य भाग्यवान टेकाम यांनी भाजपला रामराम ठोकला, नंदू नरोटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, पण हा पक्षप्रवेशाचा तमाशा शेतकऱ्यांचं पोट भरणार का?

शेतकऱ्यांचा राग अनावर!  शेतकरी संघटना संतापल्या, “धर्मराव आत्राम, तुमच्या ‘विकास गंगे’त आम्ही बुडालोच! धान सडतंय, खिसे रिकामे, आणि तुम्ही ‘जनकल्याण’चा नारा देता?” गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात, जिथे केंद्र सरकारच्या ‘पीएम धन धान्य कृषी योजना’चा डंका वाजतो, तिथेही शेतकऱ्यांच्या हातात काहीच नाही. मग हा मेळावा म्हणजे निवडणुकीसाठीचा ‘नट्टूगिरी’चा डाव की खरोखरच जनतेच्या कल्याणाचा विचार? शेतकरी विचारताहेत, “आत्राम साहेब, आधी आमच्या खिशात पैसे टाका, मग ‘एकला चलो’चा नारा द्या!” नाहीतर हा मेळावा म्हणजे फक्त निवडणुकीच्या आखाड्यातला ‘विकास’चा ढोल आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात ठरेल!

About The Author

You may have missed

error: Content is protected !!