देऊळगाव येथे रास्ता रोको; नरभक्षक वाघ १० डिसेंबरपर्यंत पकडा, अन्यथा तीव्र आंदोलन – आमदार रामदास मसरामांचा वनविभागाला अल्टिमेटम
आरमोरी (गडचिरोली) ६ डिसेंबर :आरमोरी तालुक्यातील देऊळगाव, इंजेवारी, आकापूर, सूर्यडोंगरी, डोंगरसावंगी परिसरात गेल्या एका महिन्यात नरभक्षक वाघाने तीन शेतकऱ्यांचा बळी घेतल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज (६ डिसेंबर २०२५) दुपारी १ वाजता देऊळगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेते व हजारो शेतकरी, महिला, युवक रस्त्यावर उतरले. गडचिरोली-नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

आंदोलनादरम्यान आमदार मसराम यांनी वनविभागाला थेट धारेवर धरले. “तीन जीव गेले, शेतकऱ्यांची पिके हत्तींच्या कळपाने उधळली, तरीही वनविभाग गाढ झोपेत आहे. १० डिसेंबरपर्यंत नरभक्षक वाघ पकडला नाही, तर आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू,” असा इशारा दिला. यावर उपवनसंरक्षक वरुण यांनी १० डिसेंबरपर्यंत वाघ पकडण्याचे लेखी आश्वासन दिले.
आमदार मसराम यांच्या प्रमुख मागण्या :
– एकरी १० हजार रुपये प्रतिमहिना पीक नुकसान भरपाई
– शेतजमिनीला तारेचे कुंपण करण्यासाठी तात्काळ निधी
– शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना वनविभाग व पोलीस संरक्षण
– हत्तींच्या कळपाचा बंदोबस्त व पीक विमा योजना त्वरित लागू करणे

आंदोलनात तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, माजी जि.प. उपाध्यक्ष जीवन पाटील, दिलीप घोडाम, कवळू सहारे, गिरिधर तितरमारे, धनपाल मिसार, विश्वेश्वर दरो, प्रहारचे निखिल धार्मिक, कम्युनिस्ट नेते अमोल मारकवार, बंडू खोडके आदींसह परिसरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.
या आंदोलनामुळे परिसरातील दहशतीचे वातावरण आणि वनविभागावरील रोष पुन्हा एकदा समोर आला आहे.
