March 7, 2026

गडचिरोली नगरपरिषद निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांचा ईव्हीएम कमिशनिंग ते मतदान केंद्रांपर्यंत सक्रिय दौरा; सर्व यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश

गडचिरोली, २९ नोव्हेंबर: आगामी गडचिरोली नगरपरिषद निवडणूक-२०२५ साठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा (भा.प्र.से.) यांनी आज कृषी महाविद्यालयात सुरू असलेल्या ईव्हीएम कमिशनिंग प्रक्रियेची सखोल पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्येक ईव्हीएम युनिटची तांत्रिक तपासणी, उमेदवारांची नावे, बॅलेट पेपरची अचूकता तसेच क्लोजिंग प्रक्रिया स्वतः पडताळून पाहिली आणि आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

निवडणूक निरीक्षक मीनाज गनी मुल्ला, नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव व पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम तयार करतानाच वॉलपेपर डिस्प्ले, मतदान केंद्रांची स्वच्छता, कर्मचारी नियोजन, पिण्याचे पाणी, रॅम्प, दिव्यांग सुविधा आदी सर्व बाबींचे मूल्यांकन केले. याच ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने सुरक्षाव्यवस्था, उमेदवार-प्रतिनिधी कक्ष, पत्रकार कक्ष तसेच नागरिकांसाठीच्या सोयी-सुविधांचीही बारकाईने पाहणी केली.

शहरातील मतदान केंद्रांना भेट

ईव्हीएम कमिशनिंगनंतर जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी थेट शहरातील महत्त्वाच्या मतदान केंद्रांना भेटी दिल्या भेट दिल्या. यात महिला महाविद्यालय, झाशी राणी नगर येथील नगरपरिषद ग्रंथालय तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद शाळा यांचा समावेश होता.

या केंद्रांवर स्वच्छतागृहे, प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प व प्रवेश सुविधा, फर्निचरची व्यवस्था आदींची प्रत्यक्ष तपासणी करून किरकोळ त्रुटी आढळल्यास तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले. “मतदान प्रक्रियेत मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, सर्व केंद्रे सुबक आणि सुसज्ज असावीत,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

मतदान साहित्य वाहतूक नियोजनाला हिरवा कंदिल

मतदान साहित्याच्या वाहतुकीचा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला. कोणते साहित्य कोणत्या वेळी, कोणत्या क्रमाने आणि कोणत्या वाहनाने मतदान केंद्रावर पोहोचवायचे याबाबतची बारकाईने माहिती घेऊन अंतिम स्वरूप दिले.

“निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात,” असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यंत्रणेला दिले.

२ डिसेंबर रोजी होणाऱ्या गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व स्तरावर तयारी पूर्ण केली असून, मतदारांना निर्भय आणि सोयीस्कर वातावरणात मतदान करता यावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!