September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

गडचिरोलीच्या पेसा मोबिलायझर ताईंचा १२ डिसेंबरला नागपूरात विधानभवनावर भव्य मोर्चा

“आमच्या हक्कांसाठी आता थांबणार नाही, शासनाला झुकावेच लागेल!”

गडचिरोली, ८ डिसेंबर २०२५ : गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे चार हजाराहून अधिक पेसा मोबिलायझर ताई १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे एकत्र येत आहेत. हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियम ते विधानभवन असा भव्य मोर्चा काढून शासनाला आपली ताकद दाखवण्याचा निर्धार पेसा मोबिलायझर संघटनेने केला आहे. हा जिल्ह्याच्या इतिहासातील पेसा मोबिलायझर ताईंचा पहिलाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारा स्वतंत्र मोर्चा ठरणार आहे.

संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सौ. निकिता मडावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी बीडीओ, उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे ताईंनी म्हटले आहे. “आता निवेदन नव्हे, थेट रस्त्यावर उतरून शासनाला जाब विचारायचा आहे,” असे निकिता मडावी यांनी स्पष्ट केले.

प्रमुख मागण्या :
– पेसा मोबिलायझर ताईंचे खात्यात थेट मानधन द्यावे.

– मानधनात तात्काळ वाढ करून १० हजार रुपये करावी.

– निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा व १० लाख रुपये अपघाती विमा कवच लाभ द्यावेत.

– पेसा कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी

– ग्रामसभेला खरा अधिकार मिळावा

१२ डिसेंबरला सकाळी ठीक १०.०० वाजता यशवंत स्टेडियम येथे एकत्रीकरण, त्यानंतर विधानभवनाकडे प्रस्थान होणार आहे.

“हा मोर्चा फक्त मागण्यांसाठी नाही, तर आमच्या अस्तित्वाची, एकजुटीची लढाई आहे. आम्ही गावोगावी फिरून लोकांना जागे करतो, पण आमच्याच हक्कांसाठी आजपर्यंत कोणीही लढले नाही. आता आम्ही स्वतः लढणार आहोत,” असे भावनिक आवाहन संघटनेच्या उपाध्यक्ष अमिता नहामूर्ते ताईंनी केले.

जिल्ह्यातील अनेक तालुका अध्यक्षांनी आपापल्या भागातून बस, टेम्पो, जीप भरून ताई नागपूरला घेऊन जाण्याची तयारी सुरू केली आहे. “आमच्या पुढच्या पिढीच्या हक्कांसाठीही ही लढाई आहे” असे सांगितले.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व ताईंना आवाहन केले आहे की, “कोणत्याही परिस्थितीत १२ डिसेंबरला नागपूरला पोहोचा. जितक्या जास्त ताई येतील, तितका शासनावर दबाव वाढेल. हा मोर्चा ऐतिहासिक करायचा आहे.”

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस प्रशासनानेही तयारी सुरू केली असून शांततेत मोर्चा काढला जाईल, अशी खात्री संघटनेने दिली आहे.

१२ डिसेंबरला यशवंत स्टेडियमवर आदिवासी ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत, हातात बॅनर-फलक घेऊन हजारो पेसा मोबिलायझर ताई एकत्र येणार आहेत. हा केवळ एक मोर्चा नसून, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या आत्मसन्मानाची लढाई असणार आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!