October 21, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीता हिंगे यांचा अपघाती मृत्यू; आमदारपुत्राच्या कारने धडक

गडचिरोली, ८ डिसेंबर : मध्यरात्री नागपूर-गडचिरोली महामार्गावर पाचगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या भीषण अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रख्यात समाजसेविका गीता हिंगे (वय ५४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका महागड्या लग्झरी कारने (टोयोटा फॉर्च्युनर) त्यांच्या इनोव्हा क्रिस्टा कारला जोरदार धडक दिली. धडकेचे प्रचंड प्रमाण इतके होते की, समोरचे वाहन रस्त्यावरील लोखंडी दुभाजक तोडून हिंगे यांच्या वाहनावर जाऊन आदळले.

अपघात रात्री साधारण १२.३० ते १ वाजण्याच्या दरम्यान घडला. गीता हिंगे या आपले पती सुशील हिंगे आणि चालकासह नागपूर येथे आपल्या मुलांना भेटून परत गडचिरोलीकडे निघाल्या होत्या. अपघातानंतर तात्काळ त्यांना नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिगंभीर दुखापत झालेल्या गीता हिंगे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुशील हिंगे आणि चालक यांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धडक देणाऱ्या वाहनाबाबत संशय
प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी सांगितले की, धडक देणारे वाहन हे एका प्रभावशाली आमदाराच्या पुत्राच्या मालकीचे असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच वाहनातील व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अपघातानंतर वाहनातील सर्वजण घटनास्थळावरून पसार झाल्याचे समजते. पाचगाव पोलीसांनी वाहन जप्त केले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांनी जाहीर केलेली नाही.

अवघ्या काही वर्षांत उंचावलेले कर्तृत्व
उच्चशिक्षित असलेल्या गीता हिंगे या काही वर्षांपूर्वीपर्यंत महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. नंतर त्यांनी पूर्णवेळ समाजसेवेला वाहून घेतले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘आधार विश्व फाऊंडेशन’च्या माध्यमातून गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भात त्यांनी अविरत सेवा कार्य केले. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पोहोचवणे, ऑक्सिजन-औषधांची व्यवस्था करणे, अगदी निराधार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे अशी अनेक मानवतेची कामे त्यांनी केली. जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले.

राजकारणातही त्यांनी वेगाने मुसंडी मारली. सुरुवातीला त्या भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय होत्या. भाजप महिला मोर्चाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष आणि नंतर जिल्हा महामंत्री म्हणून त्यांनी काम केले. मात्र २०२२ मध्ये स्थानिक नगरपरिषद निवडणुकीदरम्यान माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली त्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये दाखल झाल्या. पक्षाने त्यांना थेट महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त केले. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता होती.

संपूर्ण जिल्ह्यात शोककळा
गीता हिंगे यांच्या निधनाने गडचिरोलीसह चंद्रपूर, नागपूर आणि संपूर्ण विदर्भातील राजकीय-सामाजिक वर्तुळात प्रचंड दुःख व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा अध्यक्ष नम्रता मेश्राम यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. भाजपच्या अनेक जुनी सहकारीही त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

आज दुपारी गडचिरोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गडचिरोलीच्या राजकारणात आणि समाजकारणात निर्माण झालेली ही पोकळी कधीच भरून न निघणारी अशीच राहील, अशी भावना व्यक्त होत आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!