खळबळजनक बातमी: वेतनवाढ देण्याचे आमिष दाखवून दोन वर्षे छळ; तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर शेवटी गुन्हा दाखल!
गडचिरोली ९ डिसेंबर :वेतनवाढ आणि नोकरीत स्थिरता देण्याचे लालच दाखवून तब्बल दोन वर्षे कंत्राटी आरोग्य सेविकेकडून वारंवार शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या मुलचेरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांच्यावर अखेर गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून पीडित आरोग्य सेविकेने ६ डिसेंबर रोजी घरीच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
घटनेनंतर पीडित महिलेला तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले आणि नंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे. महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “डॉ. म्हशाखेत्री दोन वर्षांपासून सतत अश्लील मागण्या करत होते. वेतनवाढ आणि कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवत त्रास देत होते. याच मानसिक छळामुळे माझ्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले.”
पीडितेने यापूर्वीच आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या होत्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुहास गाडे यांनी स्वतः रुग्णालयात भेट देऊन पीडितेची चौकशी केली. त्यानंतर अखेर गडचिरोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७५(२) व ७८(२) (लैंगिक छळ व महिलेवर अत्याचार) अंतर्गत डॉ. विनोद म्हशाखेत्री यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण आता मुलचेरा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
आरोग्य विभागातच महिलेला सुरक्षित वातावरण मिळाले नाही, हा प्रकार राज्यभर खळबळ माजवणारा ठरला आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी डॉ. म्हशाखेत्री यांना तात्काळ निलंबित करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
