April 23, 2026

जलजीवन मिशन अंतर्गत शीवणी गावात नळपाणी योजनेचा जल अर्पण सोहळा उत्साहात साजरा

गडचिरोली,  २४ फेब्रुवारी : ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याच्या केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गडचिरोली तालुक्यातील मौजा शीवणी येथे नळपाणी पुरवठा योजनेचा आज जल अर्पण (उद्घाटन) सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यामुळे गावकऱ्यांना घराघरांत सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी मिळण्याचा दीर्घकाळापासूनचा प्रश्न मिटला असून ग्रामीण जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.

जिल्हा परिषद गडचिरोलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद उददरवार, उपविभागीय अभियंता नितीन पाटील, गट विकास अधिकारी अनिकेत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोहळ्याची सुरुवात प्रभातफेरीने झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शीवणी व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या संयुक्त विद्यमाने काढलेल्या या फेरीत विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन, स्वच्छ पाण्याचे महत्त्व याबाबत घोषणाबाजी करत गावभर जनजागृती केली. नव्या नळपाण्याचे मंगल कलश डोक्यावर घेऊन महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, तर युवक व ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने सामील झाले.

ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणावर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. सर्व उपस्थितांनी जलप्रतिज्ञा घेऊन जलसंवर्धनाचा संकल्प केला. गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते आणलेल्या जलकलशांचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सोहळ्याची सांगता झाली.

उपविभागीय अभियंता नितीन पाटील यांनी योजनेची तांत्रिक माहिती सादर केली. प्रमुख अतिथींनी मनोगतात स्वच्छ पाणी ही मूलभूत गरज असल्याचे सांगत जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण व आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असे अधोरेखित केले. ग्रामपंचायत पदाधिकारी व महिलांनी शासनाचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अरुणा गोहणे यांनी केले, तर कनिष्ठ अभियंता निर्भय करेवार यांनी आभार मानले. ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, जिल्हा परिषद शाळा शीवणी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी झाला.

जलजीवन मिशनअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांत अशा योजना राबविल्या जात असून, लवकरच अधिकाधिक गावे ‘हर घर जल’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. शीवणी गावातील या यशस्वी अंमलबजावणीस ग्रामस्थांनीही उत्साहाने प्रतिसाद दिला आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!