September 9, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

चिखली ग्रामपंचायतमध्ये मोठा घोटाळा!
१२ लाख निधीचा गैरव्यवहार, ग्रामपंचायत अधिकारी रोशनी सहारे निलंबित

” गौण वनोपजाच्या १२ लाखांच्या निधीचा व्याजाने गैरव्यवहार; श्रीमती रोशनी सिध्दार्थ सहारे यांना तात्काळ निलंबित”

गडचिरोली, २४ एप्रिल २०२६: जिल्हा परिषद गडचिरोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी ग्रामपंचायत चिखली (पंचायत समिती कुरखेडा) येथील ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती रोशनी सिध्दार्थ सहारे यांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ अंतर्गत तात्काळ निलंबित केले आहे.

सन २०१५-१६ मध्ये महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रमांतर्गत गौण वनोपज उपभोगासाठी बिज भांडवल म्हणून ग्रामपंचायत चिखली अंतर्गत मौजा चिचटोला व चिखली या गावांसाठी अनुक्रमे ४ लाख व ८ लाख (एकूण १२ लाख रुपये) निधी मंजूर झाला होता. या निधीचा वापर स्पष्ट निर्देशानुसार करणे अपेक्षित होते. मात्र, प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गट विकास अधिकारी, पंचायत समिती कुरखेडा यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत हा निधी गावातील व्यक्तींना व्याजाने दिल्याचे उघड झाले.

या गंभीर अनियमिततेमुळे श्रीमती रोशनी सहारे यांनी आपल्या नियत कर्तव्याची कसूर केल्याचे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ च्या नियम ३ चा भंग केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याकडील दप्तराची सखोल तपासणी करण्यासाठी व तपासणीत अडथळा येऊ नये म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबनाविषयी महत्वाच्या तरतुदी:

  • निलंबन कालावधीत मुख्यालय — पंचायत समिती, गडचिरोली येथे ठेवण्यात आले असून, कार्यालय प्रमुखाची पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.
  • त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ नुसार निर्वाह भत्ता (सरासरी अर्धपगारी रजा + महागाई भत्ता) अनुज्ञेय राहील.
  • निलंबन कालावधीत कोणतीही खाजगी नौकरी किंवा धंदा करता येणार नाही; तसे आढळल्यास शिक्षेस पात्र होतील.
  • प्रत्येक महिन्यात “खाजगी धंदा केला नाही” याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय भत्ता मिळणार नाही.

सदर प्रकरणात पुढील चौकशी व शिस्तभंग कारवाई सुरू असून, ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वापरात पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी स्पष्ट केले आहे.

About The Author

error: Content is protected !!