September 5, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

“कथित व्हिडिओमुळे गडचिरोली पोलिस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह; अवैध दारूविक्रीला ‘अभय’ कोणाचे?”

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांकडून कारवाई होत असतानाच, पोलिस यंत्रणेतीलच काही घटकांकडून अवैध व्यवसायाला कथित संरक्षण दिले जात असल्याचा संशय निर्माण करणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर समोर आला आहे. दारूविक्रीच्या ठिकाणी पोलिस अंमलदार नोटांचे बंडल स्वीकारताना आणि संबंधित व्यक्तींशी चर्चा करताना दिसत असल्याने ‘ही वसुली नेमकी कोणासाठी?’ असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.

४ सप्टेंबर रोजी समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या या चित्रफितीमुळे गडचिरोलीच्या दारूबंदीच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित व्हिडिओ ऑक्टोबर २०२५ मधील अमिर्झा टोली परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

चित्रफितीत चार-पाच व्यक्तींच्या उपस्थितीत एक पोलिस अंमलदार बसलेला दिसतो. त्याच्या हातात नोटांचे बंडल असल्याचे चित्रफितीत दिसत असून, संबंधित व्यक्तींशी त्याचे संभाषण सुरू आहे. संभाषणातील काही भागांमध्ये अवैध दारूविक्री करणाऱ्या व्यक्तींना कारवाईपासून वाचविण्याबाबत चर्चा होत असल्याचे ऐकू येते. ‘पाच लोकांना अॅडजस्ट करतो’, तसेच अडचण आल्यास थेट संपर्क साधण्याचा सल्ला दिल्याचेही चित्रफितीत ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे.

दारूबंदी असताना ‘अॅडजस्टमेंट’ कुणाची?

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असताना अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने होत असतात. अशा परिस्थितीत पोलिस अंमलदार आणि कथित दारूविक्रेत्यांमधील हा संवाद खरा असल्यास, अवैध दारूविक्रीवर कारवाई करण्याऐवजी तडजोड किंवा ‘अॅडजस्टमेंट’ केली जात होती का? असा प्रश्न निर्माण होतो.

विशेष म्हणजे, चित्रफितीत एक कथित दारूविक्रेता ‘आता दणादण दारू विकायची, भ्यायचं कोणालाच नाही’, अशा आशयाचे वक्तव्य करताना दिसत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या संपूर्ण संवादाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

पाच नावांचा उल्लेख; एक कर्मचारी अद्याप सेवेत?

या चित्रफितीत पोलिस विभागातील पाच अधिकारी-अंमलदारांची नावे घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी दोघांची आंतरजिल्हा बदली झाल्याचे, तर एक जण सेवानिवृत्त झाल्याचे सांगितले जाते. उर्वरित एका अंमलदाराचा सध्या गडचिरोली पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याचा दावा पोलिस सूत्रांकडून करण्यात आला आहे.

यामुळे केवळ व्हिडिओची सत्यता नव्हे, तर चित्रफितीत उल्लेख झालेल्या व्यक्तींची भूमिका, पैशांच्या व्यवहाराचा संदर्भ आणि अवैध दारूविक्रीशी त्यांचा कथित संबंध याची सखोल चौकशी होणार का? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी व्हिडिओची पडताळणी केली जाईल आणि गैरवर्तन आढळल्यास संबंधित अंमलदाराविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

मात्र, प्रश्न केवळ एका पोलिस अंमलदारापुरता मर्यादित राहणार का, की अवैध दारूविक्रीच्या संपूर्ण साखळीचा आणि कथित वसुली व्यवस्थेचा तपास केला जाणार? याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दारूबंदीच्या नावाखाली कारवाईचे दावे एकीकडे आणि दुसरीकडे अवैध दारूविक्रीला कथित ‘अभय’ देणारी चित्रफीत दुसरीकडे—या विरोधाभासामुळे गडचिरोली पोलिस विभागाच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

व्हिडिओ खरा आहे का? पैशांचा व्यवहार नेमका कशासाठी झाला? ‘पाच लोकांना अॅडजस्ट’ करण्याचा कथित संवाद कोणत्या संदर्भात होता? आणि अवैध दारूविक्रीच्या मागे कोणाचे संरक्षण आहे?

या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येणे, हीच आता अपेक्षा आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!