“अन्यायग्रस्त झाडे झाडिया समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लावा, जातीय सर्वेक्षण करण्यासाठी समितीचे गठन करा” – आमदार डॉक्टर देवरावजी होळी

“आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती आ.ऊ. पाटील व सदस्य लक्ष्मणजी ढाके यांची पुणे येथे भेट घेऊन मागणी केली”
गडचिरोली ; (प्रतिनिधी) १३ फेब्रुवारी; गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या झाडे ,झाडिया, झाडे कुणबी, झाड्या कुणबी, झाडे कापू या झाडे समूहातील जातींचे राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने समितीचे गठन करून तातडीने सर्वेक्षण करावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती आ.ऊ. पाटील व सदस्य लक्ष्मणजी ढाके यांची पुणे येथे भेट घेऊन केली.
झाडे समाजाच्या आरक्षणासंदर्भात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सातत्याने शासनाशी पत्रव्यवहार, भेटी, चर्चा बैठका केलेल्या असून यापूर्वीही राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली आहे. मागील ८-९ वर्षापासून सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा करीत असून अजूनपर्यंत या समाजाला न्याय न मिळाल्यामुळे या समाजावर फार मोठा अन्याय झाली असल्याची बाब त्यांनी यावेळी आयोगाच्या समोर निदर्शनास आणून दिली. त्यामुळे या समाजाचे जातीय सर्वेक्षण होणे आवश्यक असून त्याशिवाय या समाज घटकाला न्याय मिळणार नाही. त्यामुळे राज्य मागास आयोगाच्या वतीने समितीचे गठन करून लवकरात लवकर या समाजाचे जातीय सर्वेक्षण करावे अशी मागणी त्यांनी या भेटीदरम्यान केली. यासंदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन आयोगाच्या सदस्य सचिव पाटिल मॅडम यांनी आमदार महोदयांना दिले.