“जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात गडचिरोली तालुका वार्षिक आमसभा संपन्न”
1 min read“तालुक्याच्या विकासासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक” – आ. डॉ. देवरावजी होळी
“आमसभा सुरू होण्यापूर्वीच पुलखल येथील महिलांचा ग्रामसेवक हटवण्यासाठी आमदारांना घेराव”
“शासन योजनांची योग्य अंमलबजावणी न करणारे व अनुपस्थित अधिकारी यांचेवर कार्यवाही करण्याच्या सुचना”
गडचिरोली; (प्रतिनिधी); २२ फेब्रुवारी:
आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाची आवश्यकता असून तालुक्याच्या विकासासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली पंचायत समितीच्या वार्षिक अमसभेत केली.
यावेळी मंचावर पंचायत समितीचे माजी सभापती मारोतरावजी इचोडकर उपसभापती विलासजी दशमुखे, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी श्री साळवेजी, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सोळंकी, तालुक्याचे अध्यक्ष रामरतन गोहणे, महामंत्री हेमंतजी बोरकुटे, माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव नैताम, माजी पंचायत समिती सदस्य मालताताई मडावी , उकंठराव राऊत , सिडीपिओ फरांडे, यांचे सहप्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आमसभेला सुरुवात होण्यापूर्वीच पुलखल येथील शेकडो महिलांनी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांना घेराव करून गावकऱ्यांना सहकार्य न करणाऱ्या ग्रामसेवकाला तात्काळ हटवण्यात यावे अशी मागणी केली. जोपर्यंत त्यांच्या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाणार नाही तोपर्यंत सभेला आम्ही जाऊ देणार नाही अशी भूमिका यावेळी महिलांनी घेतली. या प्रसंगी आमदार महोदय यांनी लगेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी फोन वरून चर्चा करून सदर ग्रामसेवकाला तातडीने हटवण्यात यावे अशी मागणी केली. त्यानंतरच सभेला सुरुवात झाली.
आजच्या आमसभेमध्ये घरकुल धारकांना मोफत रेतीचे वाटप करण्यात यावे. अवैद्य उत्खनन करणाऱ्या कंत्राटधारकांवर व सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे निर्देश दिले.
यावेळी शासन योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी न करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व अनुपस्थित असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना नोटीस द्यावे असेही निर्देश दिले.