“नागपूर येथील महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेत गडचिरोली जिल्हाची मोहर” ; “27 पदकांसह सांघिक खेळात विजेतेपद”
1 min readगडचिरोली, (प्रतिनिधी); 27 फेब्रुवारी : महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. कोविड प्रादुर्भावानंतर प्रथमच यावर्षी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरावरील स्पर्धांच्या यशस्वी आयोजनानंतर नागपूर येथे दि.25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गडचिरोली महसूल विभागाने बाजी मारत सांघिक क्रीडा प्रकारामधे प्रथम क्रमांक पटकविला. यात क्रिकेट प्रथम, कब्बडी प्रथम, खो खो (पुरुष) प्रथम, खो खो (महिला) प्रथम, थ्रो बॉल (महिला) प्रथम व व्हॉलीबॉल (पुरुष) मधे प्रथम क्रमांक मिळाला. वैयक्तीक क्रीडा प्रकारात मैदानी, बॅडिंटन, पोहणे, कॅरम, बुद्धिबळ स्पर्धांमध्ये जवळपास सुवर्ण पदके 20, रौप्य पदके 4 तर कास्यपदके 3 असे मिळून 27 पदके प्राप्त करून सांघिक विजेतेपदही प्राप्त केले आहे.तसेच, संचालन मध्ये द्वितीय क्रमांक व सांस्कृतीक कार्यक्रम मध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे.
कोरोनानंतर प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत 81 क्रीडा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विभागातील सुमारे 1500 महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व स्पर्धेचे आयोजन मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे तसेच क्रीकेट सामना व्ही.सी.ए. मैदान व पोहण्याची स्पर्धा नागपूर महानगरपालिकेच्या तरणतलावावर आयोजित करण्यात आली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच या क्रीडा स्पर्धांदरम्यान उपस्थित राहूल सहभागींना शुभेच्छा दिल्या होत्या. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. तर अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेच्या आयोजनासाठी यशस्वी कार्य केले.