December 23, 2024

“सूरजागड लोह खनिज खाण विस्ताराला विरोध; उच्च न्यायालयात जनहित याचिका”

1 min read

नागपूर; (प्रतिनिधी) ०४ मार्च: गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका स्थित सूरजागड लोह खनिज खाण विस्ताराविरुद्ध रायपूर येथील पर्यावरण संवर्धन कार्यकर्ते समरजित चॅटर्जी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर येत्या १ मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

२००७ मध्ये लॉयड्स मेटल ॲण्ड एनर्जी कंपनीला या खाणीकरिता सूरजागडमधील ३४८.०९ हेक्टर जमीन ५० वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे. ही जमीन दक्षिण एटापल्ली वन क्षेत्रांतर्गत येते. सध्या या खाणीमधून वर्षाला ३० लाख टन लोह खनिज काढण्याची परवानगी आहे. कंपनी ही क्षमता वाढवून एक कोटी टन करणार आहे. नियमानुसार, खणीकर्माची क्षमता मूळ क्षमतेपेक्षा ५० टक्क्यापेक्षा जास्त वाढविता येत नाही. परंतु, या खाणीच्या बाबतीत या नियमाची पायमल्ली केली जात आहे.

कंपनीची मागणी पूर्ण झाल्यास या खाणीतून रोज ८०० ते १००० ट्रक लोह खनिज काढले जाईल. त्यासाठी स्फोटके वापरले जातील. त्यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण वाढेल. नदीचे पाणी प्रदूषित होईल. मानव व प्राण्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतील. करिता, विस्ताराविरुद्ध चॅटर्जी यांनी ५ नोव्हेंबर २०२२ रोजी केंद्र व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते; पण त्याची दखल घेण्यात आली नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. महेंद्र वैरागडे कामकाज पाहतील.

 

About The Author

error: Content is protected !!