“धक्कादायक: तालुक्यात अपघात होण्यास अवैध “दारू” ही तेवढीच कारणीभूत?: बहुतांश मृत चालक दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न”
1 min readकुरखेडा: (नसीरहाशमी); २१ मे: कुरखेडा तालुक्यातील सर्वाधिक अपघाती मृत्यू एकीकडे हेल्मेट हे कारणीभूत असल्याचे बोलले जात असले तरी अपघात होण्यासाठी येथील अवैध दारू विक्री कारणीभूत ठरते हे सांगायची गरज नाहीच. काही अपवाद वगळता बहुतांश घटनेत दारूची भूमिका असतेच.
कुरखेडा तालुक्यात व प्रामुख्याने मुख्यालयात दारू विक्री जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. या दारूच्या व्यसनाने किती कुटुंब उध्वस्त केले हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून सुद्धा या विरोधात अजून संघटित जनाक्रोष उभा झालेला नसला तरी या विरोधात असंघाठीत विरोध मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतो. गेल्या अनेक दिवसापासून तालुक्याच्या गावांमध्ये जनजागृती व प्रबोधन करणाऱ्या मुक्तीपथ या अभियानाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात महिलांना एकत्रित करत गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याकरिता पुढाकार घेतला गेला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्थानिक पुढारी व नेते मंडळी स्वतःचा बचाव करताना दिसून येतात. प्रखरपणे दारू विरोधात बोलण्याची त्यांची हिम्मत कधीच दिसली नाही. मोठ्या प्रमाणात सहजतेने उपलब्ध होणारी दारू युवकांना आकर्षित करते व या व्यसनानेलीन होऊन गाडीचा वेग अनावर होतो व त्याच वेगाने झालेल्या अनियंत्रित वाहनाचा अपघात होऊन या युवकांना कायमची अपंगत्व येते किंवा आपला जीव गमवावा लागतो. ज्याप्रमाणे अपघाताच्या दुर्घटनांमध्ये मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या हेल्मेट चा उपयोग न करणे ही बाब कारणीभूत आहे हे हेरून प्रादेशिक परिवहन विभागाने हेल्मेट वापरणे सक्तीचे व बंधनकारक करण्याचा पवित्रा घेतला आहे. दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकाकडून हजार रुपये दंडाचा प्राधान यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रसिद्धी पत्र काढून जाहीर करण्यात आलेला आहे.
ज्याप्रमाणे परिवहन विभाग हा आपली जबाबदारी समजून हेल्मेट वापरणे बंधनकारक करत असला त्याच प्रमाणे पोलिस विभागाने सुद्धा अवैध दारू विक्री संदर्भात सक्त कारवाई करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. येत्या काळामध्ये या दारूमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची व गुन्हे घडण्याची मोठी शंका आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकावर कायद्याने शिस्त व दंडात्मक कारवाई करण्याची प्रावधान असले तरी प्रत्यक्षात वाहन चालक हा दारू पिऊन आहे याबाबत तपासणी करण्याचे यंत्र कुरखेडा पोलीस स्टेशनला उपलब्ध नसल्याची माहिती आहे. म्हणजे नेमका वाहन चालक हा दारू पिऊन आहे हे तपासणारे उपकरणाचे उपलब्ध नसेल तर त्याबद्दल पोलीस विभाग किती गंभीरतेने काम करत आहे हे प्रत्यक्षात समजून येते. कायद्याने दारूबंदी असलेल्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने अवैध दारूचा महापूर सुरू आहे त्याचा दुष्परिणाम ही आता येथिल लोकांना अनुभवाला मिळत आहे. ज्या लोकांना राजकारणाच्या शिदोऱ्या शिजवायचे आहेत, ते कधीही दारू विरोधात बोलण्याचा टाळतात. कारण त्यांना माहित आहे की याच दारूच्या भरोशावर त्यांनी निवडणुकीमध्ये मतदान मिळविलाय व त्यांच्या विजयामध्ये या दारू चा मोठा हिस्सा आहे. “दारू”, या विषयाला सोडून इतर विषयावर बोला असच काहीच मुक इशारा ते करत असतात.
अवैध दारू विक्रीच्या या गंभीर विषयावर वेळीच काही धोरणात्मक निर्णय न घेतल्यास युवकांची एक पिढी आपण गमावून बसू. या संपूर्ण सामाजिक विषयाला जोपर्यंत स्थानिक लोकांचा व राजनीतिक समर्थन मिळत नाही तोपर्यंत याचा बीमोड करणे अशक्य आहे. हेल्मेटची सक्ती होऊन जरी अपघातात जीव गमावण्याचे प्रमाण कमी झाले तरी दारूच्या नशेत अपघात करणारे कायमचे अपंगत्व घेऊन मृत्यूपेक्षाही मोठ्या शिक्षेचा भाग त्यांचे नशीब येईल. याकरिता प्रभावी दारूबंदी ची अंमलबजावणी करणे खूप गरजेचे आहे.