“हेल्मेटअभावी कुरखेडा तालुक्यात सर्वाधिक अपघाती मृत्यू”

हेल्मेट वापरा, अन्यथा १००० रुपये दंड भरा, आरटीओंचा इशारा
गडचिरोली (प्रतिनिधी) २० मे : कुरखेडा तालुक्यात अलिकडे झालेल्या अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे दुचाकीस्वारांचे असून त्यासाठी हेल्मेटचा वापर न करणे हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परिवहन विभागाने हा मुद्दा आता गांभिर्याने घेतला आहे. हेल्मेटचा नियमित वापर करा, अन्यथा १००० रुपये दंड भरण्यासाठी सज्ज राहा, असा इशाराच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी दिला आहे. एवढेच नाही तर दंडासोबत वाहन चालविण्याचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे.
मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 सह 194 (ड) नुसार दुचाकी वाहन चालक व त्याच्या मागे बसुन प्रवास करणाऱ्या चार वर्षावरील व्यक्तीला भारत मानक संस्थेने ठरवून दिलेल्या प्रमाणकानुसार हेल्मेट (संरक्षक शिरस्राण) वापरणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 चे कलम 250 नुसार राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गासह इतर रस्त्यांवर 50 क्युबिक सेंटीमीटरपेक्षा कमी क्षमतेचे इंजिन असलेले मोपेड व पगडी परिधान केलेल्या शिख समुदायातील व्यक्तीला मोटार वाहन कायद्यातील तरतुदीपासुन अपवाद करण्यात आले आहे.
– तर कार्यालय प्रमुखावरही होणार कारवाई
मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 194 (ड) अन्वये वाहन धारकाने नियम 129 चे उल्लंघन केल्यास तो स्वत: तसेच ज्या आस्थापनेमधील जागेवर गुन्हा घडला आहे त्या आस्थापनेचा प्रमुखसुध्दा उपरोक्त उल्लंघणास जबाबदार राहणार आहे. गडचिरोली जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा-कॅालेज, महामंडळे, नगर परिषदा व सर्व शासकीय आस्थापना, तसेच खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना, आणि कार्यालयात येणाऱ्या सर्व दुचाकी चालक व मागे बसून येणाऱ्या व्यक्तीस हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करायचे आहे. हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्तीविरुद्ध मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 129/177, 250 (1) नुसार तसेच कलम 194 (3) अन्वये संबंधित आस्थापना प्रमुखाविरूद्ध गुन्हा नोंद करुन त्यांच्याकडून 1000 रुपये दंड, तसेच वाहनधारकाची अनुज्ञप्ती (वाहन चालविण्याचा परवाना) ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी कळविले.