December 23, 2024

महिलांच्या समस्या सोडवण्यास महाराष्ट्र शासन कटिबध्द – मंगल प्रभात लोढा, मंत्री

1 min read

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिराला ऑनलाईन उपस्थिती

गडचिरोली, दि. 26 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन गुरुवारी तहसील कार्यालय सभागृह सिरोंचा या ठिकाणी महिला व बालकल्याण विभाग व तालुका प्रशासनांतर्गत आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला मंगल प्रभात लोढा, मंत्री, महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला असलेल्या सिरोंचा तालुक्याच्या शिबिराला ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती दर्शवून संबोधित केले. यावेळी त्यांनी समस्या समाधान शिबिराचे उद्दिष्ट्य सांगून जमलेल्या महिला वर्गाला मार्गदर्शन केले. स्त्रियांची कोणत्याही प्रकारची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही तसेच त्यांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन शासन महिलांच्या बाबतीत सकारात्मक आहे, त्यांच्या समस्या सोडविण्यास कटीबद्ध आहे असे शिबिराच्या माध्यमातून मंत्री महोदयांनी सांगितले.


कार्यक्रमाचे उद्घाटक भाग्यश्रीताई आत्राम, अध्यक्ष तहसीलदार सय्यद, तसेच तालुका आरोग्य अधिकारी कन्नाके, वनपरिक्षेत्र अधिकारी वझारे, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिलकुमार पटले, मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी पांचाळ, आत्मा समन्वयक लांजेवार, संरक्षण अधिकारी बुच्चे, पोलिस उपनिरीक्षक कोळी, उपविभाग अभियंता मसे तसेच इतर अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. प्रास्ताविकेच्या माध्यमातून बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी शिबिराचे उद्दिष्ट्य याविषय माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त महिलांच्या तक्रारी अपेक्षित असून त्या तात्काळ सोडवून स्त्रियांना न्याय देण्याचे उद्दिष्ट्य मांडले. तहसीलदार यांनी आपल्या संबोधनातून तालुका प्रशासन आपल्या तक्रारी सोडवण्यास सकारात्मक असून अश्या प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून तक्रारी सोडवण्याचा निश्चितच समोर प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

शिबिराच्या माध्यमातून उपसिथत महिलांच्या तक्रारी ऐकूण व सोडवून त्यांना शासनाच्या विविध योजनेच्या पुस्तिका वाटप करण्यात आल्या. सदरील शिबिराला 190 महिलांनी उपस्थिती दर्शविली. त्यापैकी एकूण 65 महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी एकूण 18 तक्रारी वेळेवर त्याचठिकाणी सोडवण्यात येवून महिलांचे समाधान करण्यात आले. उर्वरीत तक्रारींबाबत संबंधित विभागांना सूचना केल्या आहेत. कार्यक्रमावेळी उपस्थ‍ित मंत्री, मंगल प्रभात लोढा यांचे आभार प्रकाश भांदककर यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!