December 23, 2024

“चुकीला माफी नाही, सर्वोच्च सन्मानानंतरही राजेश खांडवेंवर झाली कारवाई”

1 min read

“सात वर्षात दोन राष्ट्रपती शौर्य पदक, दोन पदोन्नत्या, तरीही व्हावे लागले निलंबित”

गडचिरोली;(प्रतिनिधी); २६ मे : अवघ्या सात वर्षाच्या पोलीस दलातील सेवेत दोन वेळा राष्ट्रपती शौर्य पदक आणि दोन पदोन्नत्या मिळवणारा अधिकारी पोलीस दलात पहायला मिळणे दुर्मिळच. ती कामगिरी राजेश खांडवे नामक तरुण पोलीस अधिकाऱ्याने गडचिरोलीत केली. मात्र शिघ्रकोपी आणि स्वभावातील आतताईपणामुळे अखेर त्यांना या कमावलेल्या यशावर पाणी सोडत निलंबनाच्या कारवाईला तोंड द्यावे लागले. दोन वेळा राष्ट्रपती पदक पटकावणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची वेळ येण्याची ही घटनाही दुर्मिळच ठरली आहे.
बिड जिल्ह्याच्या केज येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या राजेश खांडवे यांना सैन्यदलात अधिकारी व्हायचे होते. पण ते शक्य झाले आणि राज्यसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन २०१५ मध्ये ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलाच्या सेवेत रुजू झाले. पहिलीच पोस्टिंग गडचिरोलीसारख्या आव्हानात्मक जिल्ह्यात मिळाली. त्यांच्या आक्रमक स्वभावाला साजेसे कामही त्यांना येथे मिळाले. सैन्यदलात शत्रुशी लढाई करण्याची संधी मिळाली नाही, पण नक्षलवाद्यांशी लढाई करता येईल म्हणून सी-६० पथकाचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले. जणूकाही स्वप्नपूर्ती झाल्याप्रमाणे त्यांनी नक्षलविरोधी अभियानात स्वतःला झोकून देऊन तब्बल १६ मोहिमांमध्ये सहभाग घेऊन काही नक्षलवाद्यांचे एन्काउंटर केले. या कामगिरीची दखल घेत त्यांना २०१८ आणि २०२० मध्ये असे दोन वेळा राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. एवढेच नाही तर पोलीस उपनिरीक्षक पदावरून आधी सहायक पोलीस निरीक्षक आणि नंतर पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. ज्या पदावर पोहोचण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना १५ ते २० वर्ष लागतात त्यावर खांडवे अवघ्या ७ वर्षात पोहोचले.
गडचिरोली जिल्ह्यात तीन वर्ष सेवा दिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना इच्छित स्थळी राज्यात कुठेही बदली देण्याचा नियम आहे. पण खांडवे यांना सात वर्ष झाली तरीही त्यांनी कुटुंबियांची इच्छा डावलून गडचिरोलीतच राहणे पसंत केले. बढती मिळाल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच त्यांना चामोर्शी पोलीस ठाण्याचा प्रभार देण्यात आला होता. एका ठाण्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना आक्रमक स्वभावाला आवर घालत थोडा पोक्तपणा अंगी बाळगावा लागतो हे खांडवे यांना कळले नाही आणि ते एकापाठोपाठ एक चुका करत गेले.
अतुल गण्यारपवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला ठाण्यात बोलवून सराईत आरोपीप्रमाणे वागणूक देणे योग्य नव्हतेच. परंतू खांडवे यांच्या एकूण कामगिरीकडे पाहता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर त्यावेळी थेट कारवाई करणे टाळले असावे. मात्र यामुळे खांडवे यांनी आपण कसेही वागलो तरी चालते, असा गैरसमज करून घेत चक्क न्यायाधिशांनाच त्यांच्या निवासस्थानी जाऊन असभ्य वागणूक दिली. यावेळी मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी खांडवे यांना आवर घालणे गरजेचे समजून अखेर त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. खांडवे यांनी आपल्या आक्रमक स्वभावाला आवर घातला असता तर सर्वोच्च सन्मानानंतर निलंबनासारख्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती.

About The Author

error: Content is protected !!