“निलंबित पोलीस निरीक्षक खांडवे यांनी नागरिकांनाही केली मारहाण?; तक्रार करण्यास मज्जाव केल्याचा गावकऱ्यांचा आरोप”
1 min readगडचिरोली (प्रतिनिधी); २६ मे : चामोर्शी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी अतुल गण्यारपवार यांना मारहाण करण्यापूर्वी त्यांची माणसं असल्याच्या संशयातून ग्रामीण भागातील काही लोकांनाही बेदम मारहाण केली होती, असा आरोप त्या नागरिकांनी आता केला आहे. खांडवे यांच्या भितीपोटी यासंदर्भात आम्ही आतापर्यंत तक्रार देण्यासाठी पुढे आलो नाही, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
प्रेस क्लबमध्ये यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना भाऊराव कुमरे (पावीमुरांडा), रामसिंग राठोड (रावनपल्ली), मोहन मोहुर्ले (मुरमुरी), मोरेश्वर कुनघाडकर (नवतळा), अंकेश शेंडे (मुरमुरी), सिताराम पदा (मुतनूर), किशोर कुनघाडकर (भाडभिडी), अंकेश मेश्राम (जोगना), अश्विन रायसिडाम (पावीमुरांडा), भूषण दहेलकर (पोकुर्डी) यांनी आपली व्यथा मांडली. दि.२० एप्रिल रोजी पहाटे आम्ही एका वाहनाने कागजनगर मार्गे कालेश्वरला दर्शनासाठी जात होतो. परंतू स्टेट बँकेजवळ गस्तीवर असलेल्या खांडवे यांनी अडवून अतुल गण्यारपवार यांची माणसं असल्याच्या संशयातून मारहाण केली. त्यानंतर गाडीत बसवून ठाण्यात घेऊन गेले. तिथे गण्यारपवार यांना बोलवून त्यांच्यासोबत आपल्यालाही मारहाण केली. परंतू तक्रार केल्यास कोणत्याही गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिल्याने आम्ही आतापर्यंत कुठे तक्रार केली नसल्याचे नागरिकांनी पत्रकारांसमोर बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान या प्रकाराबद्दल राजेश खांडवे यांना यापूर्वीच्या कामगिरीसाठी शासनाने जे सन्मानपदक दिले, ते त्यांच्याकडून परत घ्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी केली.