‘छात्तीसगड सीमेवर नक्षल्यांचा हैदोस; तेंदूफळींची जाळपोळ, नागरिकांमध्ये दहशत”
1 min read“काही काळ शांत बसलेल्या नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढले असून बुधवारी रात्रीच्या सुमारास धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सिमवेरील गावात नागरिकांनी गोळा केलेल्या तेंदूपानांची जाळपोळ केली.”
गडचिरोली (प्रतिनिधी): १ जून : काही काळ शांत बसलेल्या नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढले असून बुधवारी रात्रीच्या सुमारास धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सिमवेरील गावात नागरिकांनी गोळा केलेल्या तेंदूपानांची जाळपोळ केली. यावेळी आढळून आलेल्या पत्रकात तेंदूपानांचा भाव वाढवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. यामाध्यमातून आदिवासींचे वर्षभराचे अर्थचक्र चालते. यातून नक्षल्यांनादेखील मोठ्या प्रमाणात खंडणी मिळत असते. मात्र, मागील वर्षी कमी भाव मिळाल्याने यंदा अनेक ठिकाणी तेंदू पानाची मजुरी घसरली आहे, तर काही ठिकाणी कंत्राटदारांनी ग्रामसभांनाच तेंदूपाने गोळा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नक्षल्यांना रसद मिळणे कठीण होऊन बसले आहे. परिणामी खवळलेल्या नक्षल्यांनी मागील दहा दिवसांपासून छत्तीसडमध्ये तेंदूफळींची जाळपोळ सुरू केली आहे.