“निकाल आणि निकालानंतर कोणते कोर्सेस करावे, शिक्षणाचे काय ऑप्शन आहेत? तसंच चांगल्या पगाराचा जॉब कसा मिळवावा? या सर्व विषयांची माहिती मिळवण्यासाठी हा लेख नक्कीच वाचा”
1 min read(नसीर हाशमी, मुख्य संपादक, गडचिरोली न्यूज) : करिअर म्हटलं की मेडिकल, इंजिनीअरिंग, स्पर्धा परीक्षा असे मर्यादित पर्यायच निवडण्याचा काळ आता मागे पडला. आपण नवं काही शिकावं, नव्या संधींचा माग घ्यावा आणि इतरांपेक्षा वेगळ्या क्षेत्रात आपली कारकीर्द घडवावी असं नवीन पिढीतल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही वाटतं. त्यामुळेच करिअरच्या नवनव्या वाटा धुंडाळण्याकडे सगळ्याच आर्थिक गटातल्या कुटुंबांचा कल असतो. सध्याच्या काळात अशा नव्या वाटा शोधायला बराच वाव आहे.
गेल्या काही वर्षांत पर्यटन, हॉटेल्स, आर्ट, टेक्नॉलॉजी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत करिअरच्या अनेक नवनव्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत सायन्स साइडचा आग्रह काहीसा मागे पडतोय आणि उत्तम मार्क्स मिळवलेले विद्यार्थीही सहज आर्ट्स, कॉमर्स किंवा अन्य पर्याय निवडताना दिसतात.
हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी हा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर विस्तारत असलेला उद्योग आहे. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रातल्या करिअर संधीही भरपूर आहेत. भारत सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ही संस्था आणि इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या बॅचलर ऑफ सायन्स इन हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन या अभ्यासक्रमासाठी एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. फूड प्रॉडक्शन, फूड अँड बेव्हरेजेस सर्व्हिसेस, हाउसकीपिंग, हॉटेल अकाउंटन्सी, फूड सेफ्टी अँड क्वालिटी, टुरिझम मार्केटिंग, टुरिझम मॅनेजमेंट असे करिअरचे पर्याय या क्षेत्रात उपलब्ध होतात.
डिझाइन क्षेत्रातही करिअरच्या अमर्याद संधी आता उपलब्ध आहेत. घरं, वाहनं, कपडं यांसह अगदी आपल्या दैनंदिन वापरातली प्रत्येक गोष्ट निर्माण होते ती डिझाइनमधूनच. सर्व क्षेत्रांतल्या डिझायनर्सना मागणी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अशा संस्थांमध्ये त्यासाठी उत्तमोत्तम अभ्यासक्रम आहेत.
देशाच्या संरक्षण दलांमध्ये तरुणाईसाठी करिअरच्या अनेक चांगल्या संधी आता उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे सर्व शाखांमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी या संधींसाठी अर्ज करू शकतात. संरक्षण दलांच्या सेवेत जाण्यासाठी कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिस एक्झामचा पर्याय आहे. या परीक्षेतून डेहराडूनची इंडियन मिलिटरी अॅकॅडमी, एजिमला इथली इंडियन नेव्हल अॅकॅडमी, हैदराबादची एअरफोर्स अॅकॅडमी आणि चेन्नईची ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी या संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो. विशेषत : ज्या तरुणींना लष्करात जाऊन साहस गाजवायचं आहे, त्यांच्यासाठी ही परीक्षा उत्तम संधी प्रदान करते. तरुणींना चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीत अतांत्रिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. एअरफोर्स अॅकॅडमीमध्ये प्री-फ्लाइंग अभ्यासक्रम चालविला जातो. चेन्नईतल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये महिला आणि पुरुषांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमांसाठीच्या पात्रता निकषांची माहिती इंटरनेट, तसंच संस्थांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
गेल्या काही वर्षांत फॅशन हा अगदी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय होऊ पाहत आहे. सेलेब्रिटीजचे कपडे, स्टाइल, फॅशन या गोष्टींबद्दल सर्वसामान्यांना आकर्षण आहे. फॅशन इंडस्ट्रीचा भाग आपणही असावं असं वाटणाऱ्या प्रत्येकासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या देशातल्या सगळ्यात मोठ्या आणि भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या संस्थेकडून अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे क्षेत्र मुलं आणि मुली अशा कुण्या एकाची मक्तेदारी नसल्यामुळे सगळ्यांसाठी अभ्यासक्रम आणि करिअर संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही शाखांमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी या सगळ्याच अभ्यासक्रमांची करिअर म्हणून निवड करू शकतात.
याशिवाय, पत्रकारिता, डिजिटल कंटेंट क्रिएशन करणं, यू-ट्यूबर, ब्लॉगर बनणं, बँकिंग, शेती यांसह असंख्य विषयांत करिअर करणं आताच्या युगात शक्य आहे.