April 25, 2025

“न्यायाधिशांना धमकावल्याप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षक खांडवेंना अखेर अटक; १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी”

गडचिरोली; (प्रतिनिधी); ३ जून : चामोर्शी येथील न्यायाधिशांसोबत असभ्य वर्तन करत त्यांना धमकावल्याप्रकरणी चामोर्शी ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना अखेर शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यांना लगेच न्यायालयापुढे हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश देण्यात आला.

एप्रिल महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान अतुल गण्यारपवार यांना पहाटे ठाण्यात बोलवून मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर काही नागरिकांनीही आपल्याला त्याच पद्धतीने मारहाण करण्यात आल्याचे सांगितले. त्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गण्यारपवार यांनी चामोर्शी न्यायालयाकडे दाद मागत खांडवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. न्यायाधिश मेश्राम यांनी खांडवेंवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर खांडवे यांनी न्यायाधिशांनाच धमकावले. त्यामुळे खांडवे यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान याप्रकरणी त्यांच्यावर भादंवि कलम ३५३, ४५२ नुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास एसडीपीओ साहिल झरकर यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी शुक्रवारी खांडवे यांना ताब्यात घेऊन न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या आदेशावरून निलंबित पोलिस निरीक्षक खांडवे यांची चंद्रपूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!