“वडसा: दारू वाहतूक करणारी कार पकडली” ; “कुरखेडा; दारू वाहतूक करणारी कार जळाली”; दोन परस्पर घटनेत दारू तस्करांना चपराक”
1 min readकुरखेडा/देसाईगंज वडसा (ब्यु्रो) ; ४ जून : गोपनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीवरून वडसा पोलिसांनी शहरातील तुकुम वार्डातील मटण मार्केटजवळ सापळा रचून कार ताब्यात घेतली. कारमधून २ लाख ६० हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई २ जूनच्या रात्री करण्यात आली.
मोटवानी प्राथमिक निवासी शाळाकडून मटण मार्केटकडे येणाऱ्या रोडजवळ एक चारचाकी वाहन संशयितरीत्या येताना दिसले. त्याला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन थांबविले. गाडीमध्ये पुढील सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला दोन इसम बसले होते, ते गाडी थांबताच गाडीतून उतरून पळाले. ड्रायव्हरला ताब्यात घेतले. चालकाचे नाव संकेत राजू कावळे वय २८ वर्ष, रा. विर्शीवार्ड असे आहे. एम. एच. ४६ पी २३९३ क्रमांकाच्या कारची पाहणी केली असता, त्यात २ लाख ६६ हजार ६०० रुपयांची दारू आढळून आली. चार लाख रुपये किमतीची कारही जप्त करण्यात आली आहे. संकेत राजू
कावळे वय २८ वर्षे, रा. विशवार्ड, आबेज साजिद शेख, अमन अलोणे, निर्मलसिंग प्रेमसिंग मक्कड, वय ४५ वर्षे, रा. गांधीवार्ड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुजाता भोपळे हे तपास करीत आहेत.
तिकडे कुरखेडा मुख्यालय लगत असलेल्या गांधीनगर परिसरात काल रात्री अवैध दारू तस्कर करणारी मारुती स्विफ्ट डिझायर कंपनीची गाडी आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. नेमकी या गाडीला आग कशी लागली यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी चोरट्या मार्गाने होणाऱ्या या अवैध दारू तस्करीचे तार कूरखेडा येथील एका मोठ्या दारू तस्कर सोबत जूडली असल्याची विश्वासनीय माहिती आहे.
मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्यातील किशोरी येथील दारूभट्टीतून देशी विदेशी दारूचा साठा कुरखेडा तालुक्यात पोचवला जातो. मागील अनेक दिवसांपासून नान्ही परिसरातील महिलांनी गावातील अवैध दारू विरोधात एल्गार पुकारले होते. परंतु प्रशासनाच्या आसहकार्यामुळे येथील दारू यथावत सुरू असल्याची माहिती आहे. काल रात्री याच परिसरात दारू विक्री करणारी एक गाडी पेटवून लाखोंचा माल त्यात स्वाहा झाल्याची माहिती आहे. नेमक्या कशी लागली यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. कारण अवैध कामाच्या संदर्भात हे काम माझे आहे, हे सांगण्यासाठी यदा कदाचित कुणीही समोर येणार नाही.
गांधीनगर टी पॉईंट वर जळालेली गाडी ही परस्पर उचलून येथील एका कबाडीच्या दुकानात नेऊन ठेवली आहे. सदर घटने संदर्भात अजूनही कुरखेडा पोलीस स्टेशन येथे कुठलीही नोंद झाली नसल्याची माहिती आहे. मुख्यालय लगत असलेल्या या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जात असेल तर कुठेतरी प्रशासन याला खतपाणी घालत आहे असं म्हणावं लागेल. अवैध मार्गाने दारू तस्करी करणाऱ्यांनी या घटनेची वाचता फुटू नये याची पुरेपूर काळजी घेतली असली तरी याबाबतीत स्वतः सज्ञान घेऊन कुरखेडा येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते अशी माहिती आहे.