“जिल्हाधिका-यांच्या “त्या” आदेशाला न जुमानता आलापल्ली-सिरोंचा मार्गावर अवजड वाहतुक सुरुच”; “नागरिक तीव्र आंदोलन छेडणार”
1 min read
“1 जुलैच्या ‘त्या’ आदेशाची पायमल्ली,मार्गावरुन सर्रास अवजड वाहने धावतांना दिसून येत असल्याने जिल्ह्याधिका-यांच्या आदेशाची सर्रास पायमल्ली होत असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे”
अहेरी; अन्वर शेख; (तालुका प्रतिनिधी); १८ जुलै: राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरील अवजड वाहतूकीमुळे या मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. अशात पावसाळ्याच्या कालावधीत सदर मार्गावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हाधिका-यांनी 1 जुलै रोजी आदेश निगर्मित करीत अजवड वाहनधारकास तंबी देत प्रवास करण्यास मज्जाव केला होता. मात्र या तंबीला न जुमानता अवजड वाहनधारकांची मुजोरी सुरुच असल्याचे निदर्शनास येत आहे. या मार्गावरुन सर्रास अवजड वाहने धावतांना दिसून येत असल्याने जिल्ह्याधिका-यांच्या आदेशाची सर्रास पायमल्ली होत असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.
सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर धावणा-या अवजड वाहनांमुळे या मार्गाची अक्षरश: दैनावस्था झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे तसेच अवजड वाहनांच्या रेलचेलीमुळे या मार्गावर अनेक अपघात घडून आले असून यात जवळपास दोन डझण निष्पापांचे बळी गेले आहेत. तर शेकडोना कायमचे अंपगत्व आले असून अनेक किरकोळ जखमी झाले आहे. या मार्गावरील अपघाताचे सत्र लक्षात घेता नागरिकांकडून संबंधित अजवड वाहनधारकांसह प्रशासनाप्रतीही तीव्र संताप व्यक्त होत होता. वाढता जनआक्रोश लक्षात घेता जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभमीवर दुर्घटनेचा धोका बळावण्याची शक्यता लक्षात घेता 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतूकीस प्रतिबंध घातले होते. जिल्हाधिका-यांच्या या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांनीही कौतूक करीत स्वागत केले होते. मात्र काही कालावधीतच या मार्गावर पुन्हा अवजड वाहने सुरु झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून अवजड वाहनधारकांची या मार्गावर पुन्हा मुजोरी वाढली असून सर्रास वाहने मार्गावर दुमटल्या जात आहेत. जिल्हाधिका-यांचे सक्त आदेश असतांना त्या आदेशाला न जुमानता अवजड वाहतूक सुरुच असल्याने यास मुकसंमती कुणाची? असा प्रश्न निर्माण होत आहे.
“5 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत प्रवासास मज्जाव”
जिल्हाधिका-यांनी 1 जुलै रोजी जाहीर केलेल्या पत्रकानुसार आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर दोन्ही बाजुने जड वाहनांची वाहतूक करण्यास 5 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत मज्जाव केला आहे. सदर कालावधीपर्यंत पर्यायी मार्ग म्हणून सिरोंचा-आलापल्ली मार्गावर येणा-या वाहनांकरिता सिरोंचा-मंचेरियल-राजुरा-बल्लारशाह-चंद्रपूर-गडचिरोली तर आलापल्लीहून मंचेरियल मार्गे जाणा-या मार्गासाठी आलापल्ली-आष्टी-बल्लारपूर-मंचिरयल या पर्यायी मार्ग सुचविला आहे. याबाबत योग्य काळजी न घेतल्यास व सदर मार्गावर अपघात झाल्यास संबंधित विभागप्रमुख तसेच कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे तसेच आदेशाची अंमलबजावणी न करणा-या वाहतूकदारावर नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलिसांना असेल, असेही आदेशात म्हटले आहे.
सदर राष्ट्रीय महामार्गाच्या दैनावस्थेमुळे दररोजच अपघाताचे सत्र सुरु असून अनेकांनी प्राणही गमावले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये अवजड वाहतूकदारांसह संबंधित प्रशासनाप्रती आक्रोश व्यक्त होत होता. अशातच जिल्हाधिका-यांनी सदर मार्ग अवजड वाहतूकीस प्रतिबंधित केले, याचे सर्वच स्तरावरुन स्वागतही झाले. मात्र या आदेशानंतरही अवजड वाहनधारक प्रवास करतांना निदर्शनास येत आहे. त्यांची मुजोरी सातत्याने वाढत असतांना त्यांना जिल्हाधिका-यांचाही धाक नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
“मुकसंमती कुणाची; तीव्र आंदोलन उभारणार”
जिल्हाधिका-यांच्या आदेशान्वये अवजड वाहनांसाठी आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा मार्गे वाहतूक करण्यास बंदी घातली गेली. यासंदर्भाचे फलकही मार्गावर लावण्यात आले आहे. मात्र या आदेशाला न जुमानता अजवड वाहतूकधारक सर्रास वाहने दुमटत आहेत. सर्रास अवजड वाहने चालविली जात असल्याने यास मुकसंमती कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या दहा दिवसात या मार्गावरील अवजड वाहतूक बंद न झाल्यास या परिसरातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडणार.
संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते