“भामरागडचा संपर्क तुटला; आठ अंतर्गत मार्गावरील वाहतूक ठप्प , गडचिरोलीत जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाला सुरुवात”.

“गडचिरोली (प्रतिनिधी); १८ जुलै: रात्रीपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडचा संपर्क तुटला तर आठ अंतर्गत मार्ग देखील बंद झाले आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात पुरामुळे प्रचंड हानी झाली होती. त्यामुळे यंदादेखील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. गडचिरोलीत मागील काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. मात्र, रात्रीपासून आरमोरी, गडचिरोली, मुलचेरा धानोरा, चामोर्शी, अहेरी, आलापल्ली, भामरागड परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.
सध्या गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग कमी असल्याने पुराचे संकट चिंताजनक नसले तरी अधिक प्रमाणात कोसळणाऱ्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागड मार्ग बंद आहे. नाल्यांना पूर आल्याने पावीमुरांडा, पोटेगाव मार्गदेखील बंद आहे. जिल्ह्यातील काही भागात येत्या चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
“पुरामुळे बंद रस्ते”
अहेरी ते मुलचेरा मार्ग (गोमनी नाला), खुदरामपल्ली आणि कोपरअल्ली मार्ग, एटापल्ली नाक्यासमोरील मार्ग, बोलेपल्ली मार्ग (गेदा जवळ), पाविमुरंडा च्या जवळील नाल्यावरील मार्ग, चामोर्शी ते माक्केपाली मार्ग (मछली नाला), पोटेगाव च्या समोरील मार्ग आलापल्ली ते भामरागड राष्ट्रिय महामार्ग (पर्लकोटा नदी)