“मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे जिल्हा परिषदेची आढावा बैठक संपन्न”
1 min readगडचिरोली,(प्रतिनिधी);२४ सप्टेंबर: २२ सप्टेंबर २०२३, रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नियोजन भवनमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीकरिता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती लाभली. नियोजन भवन येथे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आगमन झाल्यावर सर्वप्रथम भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला फुलांचा हार अर्पण करून व त्यांना वंदन करून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. या नंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम घेण्यात आला. या नंतर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्या अंतर्गत सामान्य प्रशासन, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, कृषी, शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण तसेच लघुपाटबंधारे या विभागांनी त्यांचे प्रगती अहवाल मा. मंत्री तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह यांचे समोर सादर केले.
या प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्ण गजबे, माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) शेखर शेलार, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक फरेंद्र कुतीरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दावल साळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) अर्चना इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.