आपसी वादातून शिपायावर चाकूने वार
1 min read”जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयासमोरील घटना ; युवकाला अटक”
गडचिरोली, २८ जून : जिल्हा भूमी अभिलेखकार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर एका युवकाने आपसी वादातून चाकुने गळ्यावर सपासप तीन वार केले. यात शिपाई गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयासमोर घडली.
दिनेश काकडे (३०) असे जखमीचे नाव असून ते जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहेत. सौरभ ताटीवार (३०) रा. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची आई तालुका भूमी अभिलेख कार्यालयात शिपाई पदावर आहे. जिल्हा व तालुका भूमी अभिलेख कार्यालये एकाच परिसरात आहेत. सौरभ ताटीवार हा आईला भेटण्यासाठी कार्यालयामध्ये येत होता. दरम्यान, गुरूवारी दिनेश काकडे हे कार्यालयापासून जवळच असलेल्या मेसमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्याच्या मागे सौरभ ताटीवार हा सुद्धा मेसमध्ये पोहोचला. सौरभने दिनेशच्या गळ्यावर चाकूने सपासप तीन वार केले. रक्ताच्या धारा वाहू लागल्या. ‘मला वाचवा’ अशी आर्त हाक देत दिनेश हा कार्यालयात पोहोचला. कर्मचाऱ्यांनी सौरभला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. नेमक्या कोणत्या कारणामुळे दोघांमध्ये वाद झाला हे मात्र अजुनही अस्पष्ट आहे. दिनेशवर उपचार सुरू आहेत.