शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न देणाऱ्या हळद पिकाची लागवड करावी – डॉ. संदीप कऱ्हाळे
1 min readगडचिरोली, 28 जून : धान हे गडचिरोली जिल्ह्याचे मुख्य पिक असून फार आधीपासून या पिकाची लागवड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. परंतु अलीकडील काळात धान या एक पिक पध्दतीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आता एक पिक पध्दतीवर अवलंबून न रहाता इतर पिकांकडेही वळावे व त्यासाठी हळद हे उत्तम पर्याय ठरू शकते व आपल्या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य उंचावू शकते, असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. संदिप एस. कऱ्हाळे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्रात हळद लागवडीचे सुधारीत तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) एस.के. लाकडे, विषय विशेषज्ञ (कृषि हवामानशास्त्र) नरेश पी. बुध्देवार व घारगाव येथील लाभार्थी शेतकरी शशीकांत सलामे उपस्थित होते.
हळद नगदी पिक असून धान पिकाच्या तुलनेत हेक्टरी अधिक उत्पादन व अधिक निव्वळ नफा देणारे पिक आहे. वाळलेल्या हळदीचे बाजारभाव लक्षात घेता हे पिक आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरू शकते असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रशिक्षणाअंती हळद पिकाचे प्रथम रेषिय पिक प्रात्यक्षिक कार्यक्रमांअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना हळदीच्या पिडीकेव्ही वायगाव या वाणाचे बियाणे प्रयोगाकरीता वितरीत करण्यात आले.