December 23, 2024

आदिवासी आश्रमशाळेत सिकलसेल तपासणीने प्रवेशोत्सव साजरा

1 min read

गडचिरोली, ०४ जुलै : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत २४ शासकीय आश्रम शाळेत १ जुलै रोजी विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेशोत्सव कार्यक्रम व विद्यार्थी-पालक मेळावा उत्साहात पार पडला. प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करून सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतासह सर्व विद्यार्थी व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गणवेशाचे वितरणही करण्यात आले.

गडचिरोली प्रकल्पात गडचिरोली, कारवाफा, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही, सोडे, मुरूमगाव, सावरगाव, गॅरापत्ती, कोटगूल, कोरची, मसेली, सोनसरी, घाटी, रामगड, अंगारा, कुरंडीमाल, रांगी, भाकरोंडी, येंगलखेडा, येरमागड, रेगडी भाडभिडी, मार्कंडादेव या २४ शासकीय आश्रम शाळा असून त्यात सुमारे ७ हजार ५०० आदिवासी विद्यार्थी आहेत. शैक्षणिक सत्र २०२४-२५ करिता १ जुलैपासून प्रकल्पातील आश्रम शाळा सुरू झाल्या.

यावेळी गावातील मुख्य रस्त्यातून प्रभात फेरी काढून शैक्षणिक व सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. रांगोळीने शाळेत सजावट करण्यात आली. कार्यक्रमात आदिवासी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्तापूर्ण शिक्षण,भविष्यवेधी शिक्षण, तंबाखूजन्य पदार्थाचे होणारे दुष्परिणाम, ब्राईटर माईंड याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पालक व विद्यार्थी व प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!