बारशाच्या जेवणात टाकले विष ; पाच चिमुकल्यांसह २८ जणांना बाधा
1 min readधानोरा, ०५ जुलै : तालुक्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेवरच्या झाडापापडा ग्रामपंचायतअंतर्गत रोपीनगट्टा येथे बारशाच्या कार्यक्रमात बनविलेल्या मांसाहरी जेवणात विष टाकल्याने २८ जणांना बाधा झाल्याची धक्कादायक घटना दि. ४ जुलैला सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली. यात पाच चिमुकल्यांचा समावेश असून, सर्वांवर उपचार सुरू आहेत.
रोपीनगट्टा येथील सुरगू मुरा टेकाम यांच्या नातनीच्या नामकरणविधीचा कार्यक्रम दि. ४ जुलैला आयोजित केला होता. यानिमित्ताने टेकाम परिवाराने खास सामीश जेवणाचा बेत आखला होता.
मात्र, पहिल्या पंगतीत जेवण केलेल्यांना १५ मिनिटांतच उलट्या, मळमळ, डोकेदुखी असा त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. दुसरी पंगत थांबविण्यात आली. प्रकृती अत्यवस्थ झालेल्या सर्व १८ जणांना पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर २२ जणांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून, सहाजणांना छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे हलविण्यात आले आहे.