आकांक्षित तालुक्यातील योजनांचे निर्देशांक उंचावण्यासाठी सामूहिक प्रयत्नाने कामे करा – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार
1 min read”संपूर्णता अभियानाचा प्रारंभ’‘
गडचिरोली, ०५ जुलै : आकांक्षित तालुका कार्यक्रमातंर्गंत शिक्षण, आरोग्य, कृषी, पोषण इत्यादी विविध विकास क्षेत्रातील निर्देशांक १०० टक्के पूर्तता पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणेने सामूहिक प्रयत्नातून कामे करण्याच्या सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी दिल्या.
निती आयोगामार्फत विशेष अभियानांतर्गत ४ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत आकांक्षित तालुक्यातील विविध विकास निर्देशांक उंचावण्यासाठी संपूर्णता अभियान राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील अहेरी, सिरोंच्या व भामरागड या तीन तालुक्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात या अभियानाचे उद्घाटन नियोजन भवन येथे भुयार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निती आयोगाचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी विनयकुमार हनवटे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचकवडे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कणसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, कार्यकारी अभियंता दोरखंडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हीवंज, जिल्हा कृषी अधिकारी तुमसरे प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व आकांक्षी तालूक्यात सहा प्रमुख सामाजिक क्षेत्रांच्या निर्देशकांची 100 टक्के पूर्तता प्राप्त करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. आकांक्षित तालुक्यात कोणीही लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये व सर्व गावांना योजनेचा लाभ मिळावा अशा सूचना भुयार यांनी पुढे बोलताना दिल्या. संपूर्णता अभियानांतर्गत स्मार्ट शाळा तयार करणे साठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करणे, आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करणे, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विऊ योजनांचा लाभ देऊन सक्षम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मास्तोळी यांनी देखील यावेळी आरोग्य व कृषी विभागाच्या योजनांविषयी माहिती दिली. तर प्रशांत शिर्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध लाभार्थ्यांना धनादेश, बी-बियाणे, माती तपासणी प्रमाणपत्र, बेबी केअर किट, विद्यार्थ्यांना पुस्तके व टॅब आदी लाभाचे वाटप करण्यात आले तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला आय.टी.आय. चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.
संपूर्णता अभियान’ सर्व आकांक्षी तालुक्यातील पुढील 6 निर्देशांकावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत प्रसूतीपूर्व काळजीसाठी नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची टक्केवारी. प्रभागातील लक्ष्यित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी. प्रभागातील लक्ष्यित लोकसंख्येच्या तुलनेत उच्च रक्तदाबासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी. ICDS कार्यक्रमांतर्गत नियमितपणे पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी. मृदा नमुना संकलन उद्दिष्टाच्या तुलनेत तयार करण्यात आलेल्या मृदा आरोग्य कार्डांची टक्केवारी. प्रभागातील एकूण बचत गटांच्या तुलनेत फिरते भांडवल मिळालेल्या बचत गटांची टक्केवारी.