April 27, 2025

कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांकरीता पिकस्पर्धेचे आयोजन

गडचिरोली,दि.८ जुलै; (जिमाका): अन्नधान्य, कडधान्य व राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या ११ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी :
पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५० स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
• पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने सबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/ पासबुक पानाची प्रत.

पिक स्पर्धा बक्षिसा चे स्वरूप –
अ.क्र. स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षीस रुपये
पहिले दुसरे तिसरे
१ तालुका पातळी ५००० ३००० २०००
२ जिल्हा पातळी १०००० ७००० ५०००
३ राज्य पातळी ५०००० ४०००० ३००००
तरी खरीप हंगाम सन २०२४ पिक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा असे आवाहन बसवराज भी. मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे. या योजने बाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग महाराष्ट्र राज्य संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in किवा सबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!