सुयोगनगरात पक्के रस्ते बांधा; आमदारांना निवेदन : उपोषणाचा इशारा
1 min readगडचिरोली ; ९ जुलै : नवेगाव येथील सुयोगनगरात गेल्या १० ते १५ वर्षांपासून लोकवस्ती आहे; परंतु येथे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधण्यात आले नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने येथील कच्च्या रस्त्यावर चिखल निर्माण होत आहे. त्यामुळे येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी नगरातील नागरिकांनी आ. डॉ. देवराव होळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सुयोगनगरात पक्के रस्ते व नाल्यांचे बांधकाम न झाल्याने नागरिकांना येथून ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत. येथे पक्के रस्ते बांधावेत, अशी मागणी यापूर्वी नागरिकांच्या वतीने करण्यात आली परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे असुविधांचा त्रास नागरिकांना आता सोसावा लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासनाला निर्देशित करावे, अशी मागणी सुयोगनगरातील रहिवासी ग्रीष्मा मून यांनी केली आहे.
स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास उपोषण करणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आ. डॉ. देवराव होळी यांना निवेदन देताना उज्ज्वला चौधरी, सोनम किनाकर, हिरंका मलोडे, सोनाली वनकर, सोनम मेश्राम, वर्षा कुकूडकर, उषा सालेरवार, भूषणा खेडेकर, जयश्री दहिकार, पल्लवी गुरनुले, सविता लोणारे, पल्लवी निखाडे आदी उपस्थित होते.