मुलचेरा-घोट मार्गावर झुकले झाड, वाहतुकीला अडथळा

गडचिरोली न्यूज नेटवर्क; जुलै १३ (मुलचेरा): घोट मार्गावरील जंगलात रस्त्यावर झाड झुकले. त्याच ठिकाणी मार्ग काढताना ट्रकही चिखलात फसला, त्यामुळे वाहतूक ठप्प असून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. १२ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता हा प्रकार घडला.
मुलचेरा-घोट मार्गावर मागील पावसामुळे अनेक झाडे वाकली आहेत. तेथून मार्ग काढताना एक मालवाहू ट्रक रस्त्यालगतच्या चिखलात फसला. त्यामुळे दुपारी अडीच वाजता दुतर्फा वाहतूक खोळंबली आहे. गडचिरोलीवरून येणारी बोलेपल्ली बस तेथे उभी असून त्यात ८० प्रवासी आहेत. श्रीनगर जाणारी दुसरी बसही तेथे अडकून पडली आहे. त्यात ३० प्रवासी आहेत. शालेय विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला आहे. दरम्यान, पावसाळ्यात रस्त्यावरील धोकादायक झाडे वनविभागाने काढून घेणे अपेक्षित आहे. मात्र, वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून सामान्य नागरिकांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.