“अनखोडा-जैरामपूर मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करा; वर्षभरापासून खड्डे कायम, रात्रीच्या सुमारास अपघात वाढले”

गडचिरोली न्यूज नेटवर्क ; जुलै १२; (आष्टी) चामोर्शी तालुक्यातील अनखोडा-जैरामपूर मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे या भागातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या अनखोडा गावाजवळील पुलाच्या एका बाजूला गेल्या वर्षीच्या अति पावसाने मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहे. या भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे.
अनखोडा-जयरामपूर हा अत्यंत महत्त्वाचा व नेहमी वर्दळ राहत असलेला मार्ग आहे. या मार्गावरून रामपूर, कढोली, जयरामपूर आदी गावांतील नागरिक नेहमीच विविध कामांसाठी आष्टी येथे येतात. आपले काम आटोपून सायंकाळी गावाकडे जात असताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनधारकांना खड्डे चुकविणे शक्यच होत नाही. एक खड्डा चुकवताच दुसरा खड्डा पडतो खड्यांमुळे वाहने भंगार होण्याच्या स्थितीत आहेत. वाहनधारकांनाही पाठ व मणक्याचे त्रास वाढले आहेत. या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. अजूनपर्यंत या मार्गाची डागडुजीसुद्धा करण्यात आली नाही. मार्गाची दुर्दशा बघितली तर या मार्गाची डागडुजी करण्याऐवजी नवीन बांधकाम करणेच योग्य राहील, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी ही समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देत नाहीत. परिणामी या समस्यांचा त्रास येथील नागरिकांना करावा लागत आहे. या मार्गाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.