September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

“पोटफोडी नदीवरच्या पुलाचे काम अपूर्ण ; विद्यार्थ्यांना पोटफोडी नदीच्या पाण्यातून वाट काढत शाळा गाठावी लागते”

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १३ (गडचिरोली)जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कारवाफा गावातल्या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. साखेरा आणि इतर गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पोटफोडी नदीच्या पाण्यातून वाट काढत शाळा गाठावी लागते. या नदीवर उभारल्या जात असलेल्या नवीन पुलाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहातून जाताना कपडे भिजण्यासह पाय घसरून प्रवाहात वाहून जाण्याचाही धोका वाढला आहे.

जास्त पाऊस झाल्यानंतर नदीचा प्रवाह वाढतो. अशा स्थितीत नदी ओलांडणे जीवावर बेतू शकते. पण शिक्षणासाठी विद्यार्थी हा धोका पत्करताना दिसत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी स्कूल बससेवा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे.

साखेरा गावातील विद्यार्थ्यांना कारवाफा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, लालमशाह मडावी माध्यमिक विद्यालय व इतर दोन शाळांमध्ये शिकण्यासाठी जावे लागते. साखेरा-कारवाफा दरम्यान वाहणाऱ्या पोटफोडी नदीवर एक छोटा पूल होता. पावसाळ्यात हा पुल पुराच्या पाण्याखाली येत असे. त्यामुळे चातगाव-पेंढरी मार्गावरील वाहतूक ठप्प होत होती. या समस्येतून परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोटफोडी नदीवर नवीन पुल बांधण्याच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासन व शासनाकडून मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पोटफोडी नदीवर नवीन पुल बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. पावसाळा लागल्याने सध्या या पुलाचे बांधकाम अपूर्ण स्थितीत बंद ठेवण्यात आले आहे. कंत्राटदाराला दिलेली बांधकामाची मुदत भरण्यास आणखी बराच अवधी शिल्लक असल्याचे उपविभागीय अभियंता रविंद्रसिंह चट्टा यांनी सांगितले.

कारवाफा येथेच प्राथमिक आरोग्य केंद्रही आहे. पण नदीच्या अडचणीमुळे पावसाळ्यात आरोग्याच्या सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर येऊ शकते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!