“ऑफिसर ऑफ द मंथ सोहळा संपन्न : नक्षलग्रस्त व प्रतिकूल परिस्थितीत खडतर सेवा बजावणाऱ्या व बदली झालेल्या ४७ अधिकाऱ्यांचा सत्कार करून निरोप”
1 min read“जिल्ह्यात मुलचेरा पोलिस ठाणे, पेंढरी उपअधीक्षक कार्यालय सर्वोत्कृष्ट”
गडचिरोली न्यूज नेटवर्क; जुलै १४; (गडचिरोली) : पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या संकल्पनेतून कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर ऑफ द मंथ हा उपक्रम राबविण्यात येतो. यानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत उत्कृष्ट कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. यात मूलचेरा ठाणे व पेंढरी उपअधीक्षक कार्यालयात सर्वोत्कृष्ट ठरले. १३ जुलै रोजी पोलिस मुख्यालयात सन्मान सोहळा पार पडला. नक्षलग्रस्त व प्रतिकूल परिस्थितीत खडतर सेवा बजावणाऱ्या व बदली झालेल्या ४७ अधिकाऱ्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. यात १० पोलिस निरीक्षक, ५ सहायक निरीक्षक व ३२ उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर अधीक्षक कुमार चिंता, यतीश देशमुख उपस्थित होते. पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सामान्यांना पोहोचविण्यात आला. याबद्दल पेंढरीचे उपअधीक्षक जगदीश पांडे यांना १० हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मुलचेरा ठाण्याने प्रथम, सिरोंचा द्वितीय, तर पुराडा ठाण्याने तृतीय क्रमांक पटकावला. अनुक्रमे दहा हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र, ८ हजार रुपये व प्रशस्तीपत्र तसेच ६ हजार रुपये वा प्रशस्तीपत्र असे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अतिदुर्गम भागातील कोटगुल भामरागड, मालेवाडा, जिमलगट्टा व मन्नेराजाराम या पोलिस ठाण्यांना उत्तेजनार्थ पाच हजार रुपये रोख वा प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
यांचाही झाला सन्मान…
कृषी समृध्दी योजनेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ताडगाव यांना ५ हजार रोख व प्रशस्तीपत्र, मुरुमगाव ठाणे रोख ३ हजार रुपये व प्रशस्तीपत्र (रोजगार व स्वयंरोजगारकरिता) बेडगाव ठाणे रोख ५ हजार रुपये व प्रशस्तीपत्र, रोजगार व स्वयंरोजगारकरिता उप-पो.स्टे. दामरंचा यांना ३ हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र, शासकीय योजनांकरिता राजाराम (खां.) ५ हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र, घोट पोलिस ठाणे ३ हजार रोख व प्रशस्तीपत्र, उत्कृष्ट नावीन्यपूर्ण योजनेकरिता कोटगुल ठाण्यास रोख ५ हजार रुपये व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.