“शाळेसमोरील रस्त्यावरच चिखलाचे साम्राज्य ; विद्यार्थ्यांची वाट झाली अडचणीची”
1 min readगडचिरोली न्यूज नेटवर्क ; जुलै १७; (अहेरी/नागेपल्ल) : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यातच पावसामुळे शाळेसमोरील रस्त्यावर तुंबलेल्या नाल्यातील केरकचरा साचला असून, पाण्याचे डबके निर्माण झाले आहे. शाळेसमोरील रस्त्यावरच चिखलाचे साम्राज्य असल्याने विद्यार्थ्यांची शाळेची वाट बिकट बनली आहे. विद्यार्थ्यांची शाळेसाठी कसरत सुरू असताना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने मात्र याकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांसह पालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
पुसुकपल्ली गाव नागेपल्ली ग्रामपंचायत हद्दीत येत असून, या गावाच्या समस्या सोडविण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे. पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने नाल्यांची साफसफाई न केल्याने पावसात नाल्या तुंबून रस्त्यावर वाहत आहेत. रस्त्यावर पाण्याच्या डबक्यांसह केरकचरा साचला गेला आहे. एकंदरीत गावात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य दिसून येत आहे. नाली व गटारे पावसाच्या पाण्याने भरल्याने त्यातील घाण रस्त्यावर आली आहे. सर्वत्र दुर्गंधीयुक्त व चिखलमय वातावरण तयार झाले आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गावातील चिमुकले शैक्षणिक धडे शिकण्यासाठी आतुर आहेत. मात्र, शाळा गाठण्यासाठी चिखलयुक्त रस्ते तुडवताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. शाळा गाठण्यासाठी त्यांना चिखल तुडवत जावे लागत आहे. यात अनेकदा विद्यार्थी, तसेच नागरिक या चिखलात घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. चिखलमय रस्त्यांमुळे चिमुकल्यांसह ग्रामस्थांना मानसिक, तसेच शारीरिक त्रास होत असताना ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने प्रशासनाप्रती नाराजी आहे.
तक्रारीकडे प्रशासनाचा कानाडोळा
पावसाळ्यापूर्वी गावातील नाल्यांची सफाई करण्यात न आल्याने पुसुकपल्ली गावात सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पाऊस येताच नाल्यांतील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. विशेष म्हणजे, शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर सर्वत्र केरकचरा जमा झाला दिसून येतो. याबाबतच्या तक्रारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.