“घोट आरोग्य केंद्रात औषध अधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्त; सेवेवर परिणाम : उपकेंद्रात ही अपुरे कर्मचारी”
1 min readगडचिरोली न्यूज नेटवर्क ; जुलै १७; (घोट) : चामोर्शी तालुक्याच्या घोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. घोट प्राथमिक आरोग्य केंद्र व अधिनिस्त उपकेंद्र रामभरोसे असल्यामुळे सामान्य ग्रामीण गरीब नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
घोट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण लोकसंख्या १९ हजार आहे. घोट प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यिकेचे एक पद रिक्त आहे. तर आरोग्य सेवक पुरुष यांचे घोट, हळदवाही, नेताजीनगर, पेटतळा, विष्णूपुर येथील पदे रिक्त आहेत. आरोग्य सेविकांची आरोग्य केंद्र घोट येथील २, उपकेंद्र घोट १ यासह पेटतळा, हळदवाही येथील पदे रिक्त आहेत.
पावसाचे दिवस असल्याने साथरोग व इतर आजाराचा प्रभाव वाढत असतो. यावर उपयोजना करण्यासाठी आरोग्य उपकेंद्राची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांना योग्य उपचार मिळण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. चामोर्शी तालुक्यांतील घोट हे महत्त्वाचे स्थळ आहे. रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावे घोट जवळ असल्याने उपचारासाठी परिसरातील नागरिकांचा घोट गावाशी दैनंदिन सबंध येतो. सर्वच उपकेंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे.