December 23, 2024

“उद्योग आस्थापनांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी संजय दैने”

1 min read

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १८ ( गडचिरोली ) : राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नुकतीच जाहीर झाली आहे. या योजनेंतर्गत शासनामार्फत शैक्षणिक अर्हता 12 वी पास करीता प्रतिमाह विद्यावेतन 6 हजार रुपये, आय.टी.आय/पदविकाधारकास प्रतिमहा 8 हजार रुपये तर पदवीधर/पदव्युत्तर उमेदवारास प्रतिमहा 10 हजार याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा विद्यावेतन जमा करण्यात येईल. शासनाने दिलेल्या विद्यावेतनाव्यतीरिक्त प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देण्याची मुभा आस्थापना व उद्योगांना राहणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोहचवावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था, कंपनी, लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप व विविध आस्थापनांनी मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

काय आहे योजना : जिल्ह्यातील युवक वर्ग आपले शिक्षण पुर्ण करून दरवर्षी मोठया संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 12 वी पास, विविध ट्रेडमधील आय.टी.आय., पदविधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

येथे करा संपर्क : जिल्ह्यात मागील 3 वर्षापूर्वीपासून कार्यरत नोंदणीकृत उद्योग/आस्थापनांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या http://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर आस्थापनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली येथे तसेच दूरध्वनी क्रमांक 07132-222368 या क्रमांकावर संपर्क साधावा.

About The Author

error: Content is protected !!