“पतीने पत्नीची कुऱ्हाडीने सपासप वार करत केली निर्घृण हत्या”
1 min read“आरोपी पतीला अटक : अहेरी तालुक्यातील घटना”
गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १८; (गडचिरोली) : चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीची कुऱ्हाडीने सपासप वार करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अहेरी तालुक्यात १७ जुलै रोजी घडली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी शून्य एफआयआर दाखल केली आहे. रत्ना सदशिव नैताम (वय ३५) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर सदाशिव लखमा नैताम (वय ४५ रा. मांड्रा ता. अहेरी) असे या प्रकरणातील आरोपी पतीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदाशिव लखमा नैताम हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. बुधवारी १७ जुलै रोजी सकाळच्या सुमारास दोघांत वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी पतीने पत्नीच्या तोंडावर आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप दोन वार केले अन् ती रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळली. त्यांनतर आरोपी पती देखील रक्ताच्या थारोळ्यात तिच्याच बाजूला पडून राहिला.
सदाशिव नैताम याचा १८ वर्षीय मुलगा चिरंजीव नैताम हा आपल्या शेतात काम करत असताना घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने हत्या केली. त्याला रक्ताने माखलेल्या कपड्यावर आणि रत्नाला रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्याचे पाहून चिरंजीवचा चुलत भाऊ राहुल हनमंतू नैतामने शेतात धाव घेऊन चिरंजीवला माहिती दिली. मुलगा चिरंजीव घरी येऊन पाहताच त्याने एकच हंबरडा फोडला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.
चिरंजीवने आपल्या आजी आजोबा आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्याच्या वडिलांना बांधून ठेवले व घटनेची माहिती दामरंचा पोलिसांना दिली. त्यांनतर लगेच चारचाकी वाहनाने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रत्ना सदाशिव नैताम यांना मृत घोषित केले. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रयावरून व फिर्यादी मुलगा चिरंजीव सदाशिव नैताम याच्या जबाबावरून गुन्हा नोंद करून अहेरी पोलिसांनी तपासात घेतला आहे. या घटनेचा पुढील तपास जिमलगट्टा उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत दासुरकर यांच्या मार्गदर्शनात दामरंचा उप पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गणेश शिंदे करणार आहेत.